विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताची फलंदाजी कोलमडली. न्यूझीलंडने दिलेल्या २४० धावांचा पाठलाग करताना भारताचे ६ फलंदाज १०० धावसंख्येच्या आतच माघारी परतले. भारताच्या आघाडीच्या फळीतले ३ फलंदाज केवळ एक धाव काढून माघारी परतले. पहिले ३ फलंदाज माघारी परतल्यानंतर धोनीने मैदानात येणं गरजेचं होतं. मात्र दिनेश कार्तिक मैदानात आल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. समालोचनादरम्यान गांगुलीने भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर टीका केली. “३ विकेट गेल्यानंतर धोनीला संधी न मिळणं ही गोष्ट खरचं अनाकलनीय आहे. ज्या क्षणी भारताला धोनीची गरज आहे, त्यावेळी तो मैदानात नाहीये. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. या क्षणी भारताला धोनीच्या अनुभवाची गरज होती. जेव्हा तुमचे पहिले ३-४ फलंदाज २५ धावांच्या आत माघारी परततात, त्यावेळी तुमचा अनुभवी फलंदाज मैदानात येणं अपेक्षित असतं.”

दरम्यान दिनेश कार्तिकलाही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. २५ चेंडूत अवघ्या ६ धावा काढत कार्तिक हेन्रीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. निशमने कार्तिकचा सुरेख झेल पकडला.

Story img Loader