Sourav Ganguly on Rahul Dravid: बीसीसीआयने राहुल द्रविड भारताचे मुख्य प्रशिक्षक राहतील याची पुष्टी केली होती, परंतु नुकतेच एक विधान करून स्वतः द्रविडने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ निवडीबाबत द्रविडने गुरुवारी दिल्लीत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि बीसीसीआय सचिन जय शाह यांची भेट घेतली होती. यानंतर त्याने स्वत: कराराच्या मुदतवाढीबाबतच्या कागदपत्रावर स्वाक्षरी केली नसल्याची माहिती दिली. मात्र, द्रविड टी-२० विश्वचषकापर्यंत करार वाढवण्यास तयार असल्याचे मानले जात आहे.
बीसीसीआयने सर्व प्रशिक्षकांचा कार्यकाळ वाढवला
टी-२० विश्वचषक स्पर्धेला फक्त सात महिने बाकी आहेत आणि अशा परिस्थितीत बीसीसीआयला संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंमधील सातत्य तोडायचे नव्हते. फक्त द्रविडच नाही तर बीसीसीआयने संपूर्ण सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच विक्रम राठोड हे फलंदाजी प्रशिक्षक, पारस म्हांबरे गोलंदाजी प्रशिक्षक आणि टी दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक राहतील. एकदिवसीय विश्वचषकात भारताच्या प्रभावी कामगिरीमागे द्रविड आणि त्याचा संघ हे एक प्रमुख कारण होते.
गांगुलीने द्रविडला मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी मनवले होते
“राहुल द्रविडला वरिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी मनवणे हे बोर्डासाठी काही नवीन नाही,” असे मत सौरव गांगुलीने व्यक्त केले. रवी शास्त्री यांनी टी-२० विश्वचषक २०२१ नंतर या पदावर कायम न राहण्याचा निर्णय घेतला आणि बीसीसीआय अध्यक्ष म्हणून सौरव गांगुलीच्या कार्यकाळात द्रविडला मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारण्यास मनवले होते. भारताचा माजी कर्णधार गांगुली त्याच्या सहकाऱ्याच्या करार वाढीमुळे खूश आहे आणि त्याने नुकत्याच दिलेल्या निवेदनात त्याचा उल्लेखही केला आहे. गांगुली तेव्हा बीसीसीआयचे अध्यक्ष होते आणि द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक होता.
हेही वाचा: वैशाली भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर
गांगुलीने द्रविडला शुभेच्छा दिल्या
गांगुली म्हणाला, “मला आश्चर्य वाटत नाही की त्यांनी द्रविडवर विश्वास दाखवला आहे. मी मंडळाचा अध्यक्ष असताना आम्ही त्यांना द्रविडचे काम पटवून दिले होते. त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आल्याचे पाहून मला खूप आनंद झाला आहे.” तो पुढे म्हणाला की, “द्रविडच्या बाबतीत हे नेहमीच होत आले आहे आणि ते त्याला हवे आहे की नाही यावर सर्व काही अवलंबून असते. जूनमध्ये होणाऱ्या आणखी एका विश्वचषकासाठी मी भारतीय संघ आणि द्रविडला शुभेच्छा देतो. विश्वचषक २०२३मध्ये ते विजयाच्या अगदी जवळ होते.”
टीम इंडिया विश्वचषकातील सर्वोत्तम संघ ठरली- गांगुली
सौरव गांगुली पुढे म्हणाला, “यावेळी द्रविडने ट्रॉफी जिंकली नसेल, पण टीम इंडिया ज्या पद्धतीने खेळली, ते या स्पर्धेतील सर्वोत्तम संघ होता. त्यामुळे वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी त्यांच्याकडे सात महिने आहेत. यावेळी टीम इंडिया उपविजेती नसून चॅम्पियन बनेल अशी अपेक्षा आहे.”
गांगुली काय म्हणाला?
गांगुली पुढे म्हणाला, “किमान टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचत आहे आणि स्पर्धेत वर्चस्व गाजवत आहे. आशा आहे की संघ एक दिवस ते आव्हान पार करेल. त्यांचे नशीब बदलेल, यात रॉकेट सायन्स नाही. ऑस्ट्रेलियाच्या ४७ धावांवर तीन विकेट्स पडल्यानंतर भारताला एक विकेट घेण्याची चांगली संधी होती आणि तसे झाले असते तर गोष्ट वेगळी असती.”
द्रविडसाठी कठीण आव्हाने
आगामी काळात द्रविडसमोर खडतर आव्हाने आहेत. दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीवर पराभूत करण्यासाठी भारताला मदत करावी लागेल. या दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. आयसीसी विश्वचषकात भारताच्या विजेतेपदाच्या दुष्काळाबाबत विचारले असता गांगुली म्हणाला, “आशा आहे की टीम इंडिया लवकरच तो संपवेल. कर्णधार म्हणून मी तीन फायनल खेळलो आणि दोनदा हरलो. २००३ विश्वचषक आणि २००१ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पराभूत झालो. त्यामुळे अंतिम सामना कसा जिंकायचा हे सांगण्याचा मला अधिकार नाही. मी फक्त एकच विजय नोंदवू शकलो आणि तोही श्रीलंकेसह (२००२ चॅम्पियन्स ट्रॉफी) संयुक्त विजेता म्हणून होता.”