सध्या भारत आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. परंतु टीम इंडियाची नजर यावेळी विश्वचषकावर आहे, २०२३ सालचा एकदिवसीय विश्वचषक फक्त भारतातच होणार आहे. आयसीसी ट्रॉफीचा १० वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील आहे. अशात बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एकदिवसीय विश्वचषकासाठी सध्याच्या संघाला टिप्स दिल्या आहेत.
सौरव गांगुली स्पोर्ट तकशी बोलताना म्हणाला, ”भारताचा संघ कधीही कमकुवत असू शकत नाही. कारण आमच्याकडे खूप प्रतिभा आहे. निम्म्याहून अधिक खेळाडूंना संघात खेळण्याची संधी मिळत नाही. राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि निवडकर्त्यांनी विश्वचषकापर्यंत या संघासोबत खेळत राहावे, अशी माझी इच्छा आहे.”
सौरव गांगुली म्हणाला, ”टीम इंडिया जेव्हा वर्ल्डकप खेळायला सुरुवात करेल, तेव्हा त्यांनी कोणत्याही प्रकारचे ओझे घेऊ नये. ट्रॉफी जिंको किंवा न जिंकू तिथे बिनधास्त क्रिकेट खेळले पाहिजे.” माजी कर्णधार म्हणाला की, ”ज्या संघात शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजासारखे खेळाडू आहेत, तो कधीही कमकुवत असू शकत नाही.”
हेही वाचा – IND vs AUS: ‘हे दुःख मला आयुष्यभर सतावत राहील…’; कसोटी मालिकेला मुकलेल्या ‘या’ धडाकेबाज खेळाडूचे वक्तव्य
मिशन वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया सज्ज आहे –
टीम इंडियाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. टीम इंडियाने आधी श्रीलंकेविरुद्ध आणि नंतर न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका जिंकली. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सातत्याने पुढे जात आहे, अशा स्थितीत नजर फक्त एकदिवसीय विश्वचषकाच्या ट्रॉफीवर खिळली आहे.
आतापासूनच्या विश्वचषक संघावर नजर टाकली तर जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा दुखापतीतून सावरत आहेत. याचा अर्थ त्यांना विश्वचषकापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची संधी आहे. दुसरीकडे, ऋषभ पंतबाबत सस्पेन्स आहे, कारण कार अपघातानंतर तो किती महिने क्रिकेटपासून दूर राहणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.