सध्या संपूर्ण जगभरासह भारतात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भीषण वातावरण आहे. प्रत्येक दिवशी देशातील महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. मात्र देशातील काही राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवल्यामुळे यंदाच्या हंगामातील आयपीएलवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. बीसीसीआयचे काही अधिकारी यंदाच्या हंगामातील आयपीएल स्पर्धा रद्द होणार नाही असं सांगत असले तरीही बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सध्याच्या घडीला आयपीएल स्पर्धा खेळवणं शक्य नसल्याचे सूचक संकेत दिले आहेत.

“सध्याच्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, पण आता सांगण्यासारखं काहीच नाही…आणि सांगण्यासारखं आहे तरी काय?? विमानतळं बंद आहेत, लोकं घरात अडकली आहेत, ऑफिस बंद आहेत, कोणीही कुठेही जाऊ शकत नाहीये. सध्याची परिस्थिती पाहता मे महिन्याच्या मध्यापर्यंत अशीच परिस्थिती राहिल असा अंदाज आहे. तुम्ही खेळाडूंना कुठून आणणार? ते प्रवास कसा करतील?? सध्या जगभरात कोणतीही क्रीडा स्पर्धा खेळवली जाईल अशी परिस्थिती नाही, आयपीएल तर विसरुनच जा.” गांगुलीने The New Indian Express वृत्तसमुहाला माहिती दिली.

मध्यंतरी BCCI आयपीएलसाठी नवीन पर्यायांची चाचपणी करत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र सध्या काहीही सांगण शक्य नसल्याचं गांगुली म्हणाला…

 

केंद्र सरकारकडून लॉकडाउनसंदर्भात अधिकृत माहिती येईपर्यंत आता आयपीएलबद्दल काहीही सांगण शक्य होणार नसल्याचंही गांगुलीने स्पष्ट केलं. “सोमवारी मी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बोलल्यानंतर तुम्हाला अधिक माहिती देऊ शकेन. पण अगदी मनापासून सांगायला गेलं तर सध्या संपूर्ण जग ठप्प झालेलं आहे, अशा परिस्थितीत खेळाचं भविष्य काय असेल हा प्रश्नच आहे.” प्रत्येक दिवशी देशभरात करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असून आतापर्यंत १५० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.