आयपीएलच्या सहाव्या पर्वामध्ये झालेल्या ‘स्पॉट-फिक्सिंग’ आणि सट्टेबाजी प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुद्गल समितीमध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा समावेश करण्यात आला आहे. न्यायमूर्ती मुकुल मुद्गल यांनी या समितीमध्ये एखादा माजी क्रिकेटपटू असायला हवा, अशी मागणी केली होती, यासाठी गांगुलीचे नाव चर्चेत होते आणि रविवारी त्याच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले.
‘‘गांगुलीला आयपीएल चौकशी समितीमध्ये सहभाग करण्याबाबत आम्ही विनंती केली होती आणि त्यानेही या विनंतीचा स्वीकार केला आहे. या प्रकरणाच्या तपासामध्ये त्याची आम्हाला चांगली मदत होऊ शकते. मी गांगुलीशी दूरध्वनीवर संवाद साधला आणि या समितीमध्ये काम करण्यास तयार असल्याचे त्याने सांगितले, पण आतापर्यंत कधी भेटायचे हे मात्र ठरलेले नाही,’’ असे मुद्गल यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने निरपराध आणि प्रामाणिक क्रिकेटपटूला चौकशी समितीमध्ये सहभागी करण्याबाबत सूचना केली होती. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी बऱ्याच जणांना अटक केली होती. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी या प्रकरणामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यासह  १३ जणांवर आरोप केले होते. यामध्ये काही क्रिकेटपटूंचीही नावे असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे चौकशी समितीला क्रिकेटच्या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या एका माजी क्रिकेटपटूची गरज होती.
‘‘आम्हाला या प्रकरणात क्रिकेटच्या दृष्टिकोनातून मदत करणे हे गांगुलीचे काम असेल. यासाठी त्याला समालोचन आणि स्तंभलेख या जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवण्यात येणार नाही,’’ असे मुद्गल यांनी सांगितले.

Story img Loader