भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीच्या घरात चोरी झाली आहे. सौरवचा महागडा मोबाईल चोरीला गेला आहे. सौरवने प्रसारमाध्यमांना सांगितलं कोलकात्यामधील त्याच्या घरातून मोबाईल चोरीला गेला आहे. गांगुलीने याप्रकरणी शनिवारी (१० फेब्रुवारी) ठाकूरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गांगुलीच्या चोरीला गेलेल्या मोबाईलची किंमत तब्बल १.६ लाख रुपये इतकी आहे.
हिंदुस्तान टाईम्स बांगलाने दिलेल्या वृत्तानुसार सौरव गांगुलीने म्हटलं आहे की, मला वाटतं माझा मोबाईल घरातूनच चोरीला गेला आहे. मी माझा फोन १९ जानेवारी रोजी शेवटचा पाहिला होता. त्या दिवशी सकाळी मी फोन शोधत होतो, मला फोन सापडला नाही. २० दिवस झाले फोन सापडला नाही. अखेर मी आज पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. माझ्या फोनमध्ये खासगी माहिती, महत्त्वाचे फोन नंबर, बँकांशी संबंधित माहिती आहे, ही माहिती लिक होण्याची भीती आहे.
सौरव गांगुली म्हणाला, “माझ्या फोनमध्ये बँक खात्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती आहे. मी पोलिसांना सांगितलं आहे की, शक्य तितक्या लवकर माझा फोन शोधण्याचा प्रयत्न करा. तसेच ही चोरी करणाऱ्यावर उचित कारवाई करा.” सौरवने ठाकूरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सौरव म्हणाला, “माझ्या घरात डागडुजी आणि रंगकाम सुरू असताना फोन चोरीला गेला आहे.” दरम्यान, दादाच्या संशयावरून पोलीस त्याच्या घरात काम करणारे कर्मचारी आणि रंगकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी करणार आहेत. सौरवला फोनमधील बँकांशी संबंधित माहितीचा दुरुपयोग केला जाण्याची तसेच आर्थिक फसवणुकीची भीती सतावतेय.
गांगुली पश्चिम बंगालचा सदिच्छादूत
सौरवर गांगुली बऱ्याचदा राजकीय व्यासपीठावर दिसत असतो. तसेच तो केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्याबरोबर अनेकदा दिसला आहे. याच कारणामुळे सौरव गांगुली बंगालच्या राजकारणात उडी घेणार का? असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या सरकारने सौरव गांगुली याची पश्चिम बंगालचा सदिच्छादूत म्हणून नेमणूक केली आहे. याआधी अभिनेता शाहरुख खान पश्चिम बंगालचा सदिच्छादूत (ब्रँड अँबेसेडर) होता.