Sourav Ganguly Car Accident: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारला पश्चिम बंगालमधील दुर्गापूर एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. गांगुली एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. या अपघातात सौरव थोडक्यात बचावला. मिळालेल्या माहितीनुसार दंतनपूरजवळ गांगुलीच्या ताफ्यासमोर अचानक एक ट्रक आल्यामुळे, गांगुलीच्या कार चालकाला ब्रेक लावावे लागले आणि यामुळे मागून येणारी अनेक वाहने एकमेकांवर आदळली.

या अपघातानंतर सौरव गांगुली १० मिनिटे घटनास्थळी उपस्थित होता, त्यानंतर तो कार्यक्रमासाठी निघून गेला, असे वृत्त आहे. सुदैवाने, वेळेवर ब्रेक लावल्याने कोणीही जखमी झाले नाही आणि मोठा अपघात टळला. या अपघाताबाबत सौरव गांगुलीने स्वतः किंवा त्याच्या व्यवस्थापकांनी कोणतेही विधान अद्याप जारी केलेले नाही. परंतु गांगुलीला या अपघातात कोणतही इजा झालेली नाही.

दरम्यान सौरव गांगुली बर्दवान विद्यापीठातील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना हा अपघात झाला आहे. अपघातानंतर तो वर्धमान क्रीडा संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाला. या कार्यक्रमात बोलतना गांगुली म्हणाला, “मी भारावून गेलो आहे. बर्दवानमध्ये येऊन खूप छान वाटत आहे. तुम्ही मला आमंत्रित केले याचा मला आणखी आनंद झाला आहे. बर्दवान स्पोर्ट्स असोसिएशन मला बऱ्याच काळापासून बोलावत होते. आज इथे येऊन खूप छान वाटत आहे. सीएबी गेल्या ५० वर्षांपासून बर्दवान क्रीडा संघटनेसोबत काम करत आहे. जिल्ह्यातून अनेक खेळाडू उदयास आले आहेत.”

गेल्या महिन्यात गांगुलीच्या मुलीच्या कारला अपघात

सौरव गांगुली याची मुलगी सना गांगुलीच्या कारलाही गेल्या महिन्यात कोलकात्यातील डायमंड हार्बर रस्त्यावर एका बसने धडक दिल्याची घटना घडली होती. मात्र, यामध्ये सनाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नव्हती. डायमंड हार्बर रस्त्यावरील बेहाला चौरस्ता परिसरात बसने सना गांगुलीच्या कारला धडक दिली होती. त्यावेळी सना गांगुली ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसली होती.

गांगुलीची क्रिकेट कारकिर्द

सौरव गांगुलीच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने एकदिवसीय क्रिकेटच्या ३११ सामन्यांमध्ये ११३६३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २२ शतके आणि ७२ अर्धशतके ठोकली आहेत. याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ११३ सामन्यांमध्ये ७२१२ धावा केल्या, ज्यात १६ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे.

Story img Loader