Sourav Ganguly On India-Pakistan Cricket: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा थेट सहभाग असल्याचे आता स्पष्ट होत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण देशात पाकिस्तान विरोधात वातावरण आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध संपुष्टात येण्याची चर्चा आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या संपूर्ण प्रकरणावर कडक भूमिका घेतली आहे. सरकारने, पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे असे आवाहन गांगुलीने केले आहे. याचबरोबर पाकिस्तनाबरोबरचे सर्व क्रिकेट संबंध तोडावे असेही म्हटले आहे.
कोलकातामध्ये, जेव्हा सौरव गांगुलीला विचारण्यात आले की, भारताने पाकिस्तानशी क्रिकेट संबंध तोडावेत का? तेव्हा सौरव गांगुली म्हणाला, “१०० टक्के तोडावे. पाकिस्तानने केलेल्या कृत्यावर कठोर कारवाई करावी. हा चेष्टेचा विषय नाही, अशा गोष्टी दरवर्षी घडतात. आता दहशतवाद सहन करता येणार नाही.”
दरम्यान २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तान दौऱ्यावर पाठवलेले नाही. या काळात भारत आणि पाकिस्तानमध्ये केवळ एक मालिका वगळता कोणतीह द्विपक्षीय मालिका झालेली नाही. अलिकडेच, बीसीसीआयने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाला पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला होता. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे सामने दुबईत खेळवण्यात आले होते.
दरम्यान, २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला होता. यामध्ये देशभारातील २५ आणि नेपाळचा एक अशा एकूण २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
या दहशवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना माघारी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
परराष्ट्र मंत्रालयाने २४ एप्रिल रोजी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, व्हिसा संबंधित हे नियम हिंदू असलेल्या आणि भारतात राहण्यासाठी दीर्घकालीन व्हिसा मिळालेल्या पाकिस्तानी नागरिकांना लागू होणार नाहीत. तसेच, जे लोक वैध कागदपत्रांसह पाकिस्तानला गेले आहेत त्यांना १ मे पूर्वी भारतात येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारत सोडण्याचे आदेश दिल्यानंतर, पाकिस्तानी नागरिक पंजाबमधील अमृतसरमधील अटारी-वाघा बॉर्डर क्रॉसिंगद्वारे पाकिस्तानात परत जात आहेत. कालपर्यंत १९१ पाकिस्तानी नागरिक भारतातून पाकिस्तानात गेले आहेत. तर २८७ भारतीय पाकिस्तानातून भारतात परतले आहेत.