इंग्लंडमध्ये होणारी विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना, भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमाचं कोडं अजुन सुटलेलं नाहीये. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार यासाठी भारताने गेल्या वर्षभरात विविध प्रयोग करुन पाहिले, मात्र यातून हाती काहीच लागलं नाही. यावर भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने टीम इंडियाला एक आगळावेगळा सल्ला दिला आहे. भारताने वन-डे संघात चेतेश्वर पुजाराला स्थान देऊन, त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी द्यावी असं मत सौरव गांगुलीने व्यक्त केलं आहे. तो India TV वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव भारतासाठी धोक्याची घंटा !

“माझ्या डोक्यात एक असा उपाय आहे, ज्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही किंबहुना बहुतांश लोकं यावर हसतील. पण माझ्यासाठी चेतेश्वर पुजाराला वन-डे संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी द्यायला हवी. त्याचं क्षेत्ररक्षण जरासं ढिसाळ असलं तरीही तो एक चांगला फलंदाज आहे. अनेकांना हा पर्याय योग्य वाटणार नाही. मात्र तुम्हाला संघात एका चांगल्या आणि तंत्रशुद्ध फलंदाजांची गरज आहे, तर सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांपेक्षा पुजारा या जागेसाठी योग्य उमेदवार ठरतो.” गांगुलीने आपलं मत मांडलं.

“ज्या प्रमाणे राहुल द्रविड याआधी भारतीय वन-डे संघात महत्वाची भूमिका बजावायचा, त्याचप्रमाणे पुजाराही तशीच भूमिका बजावू शकतो. पण हा विचार माझा आहे, अनेक लोकं याच्याशी सहमत होणार नाहीत. मात्र काही वेळेला वन-डे क्रिकेटमध्ये तुम्हाला फलंदाजीमध्ये स्थैर्य हवं असतं, पुजारा ते स्थैर्य तुम्हाला देऊ शकतो. भारताचे पहिल्या ३ क्रमांकाचे फलंदाज सध्या चांगल्या फॉर्मात असताना पुजाराला चौथ्या जागेवर संधी देण्यात काहीच हरकत नाही”, सौरव गांगुली बोलत होता.

अवश्य वाचा – विराट कोहली वन-डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळाडू बनण्याच्या वाटेवर – शेन वॉर्न

नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषकाआधी टीम इंडियाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय वन-डे मालिका होती. यानंतर २३ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होतील. अखेरच्या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने, विश्वचषकासाठी भारतीय संघ जवळपास निश्चीत झाला असून एका जागेसाठी विचार सुरु असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे कोणत्या खेळाडूला विश्वचषकाचं तिकीट मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.