महेंद्रसिंह धोनीने भारताच्या वन-डे मालिकेतील विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावली. 3 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकं झळकावून धोनीने भारताला मालिका जिंकवून देण्यात महत्वाचा वाटा उचलला. 2018 वर्षात आपला फॉर्म हरवून बसलेल्या धोनीसाठी ही खेळी अतिशय दिलासाकारक होती. संथ खेळीसाठी गेल्या काही महिन्यांमध्ये धोनीवर अनेकदा टीका करण्यात आली होती. मात्र कर्णधार विराट कोहलीने प्रत्येक वेळी धोनीला आपला पाठींबा दर्शवला होता. त्याच्या याच वृत्तीचं माजी कर्णधार सौरव गांगुलीने कौतुक केलं आहे.

अवश्य वाचा – वन-डे क्रिकेटमध्ये अजुनही धोनीच सर्वोत्तम फिनीशर !

“धोनी सध्या संघातला सिनीअर खेळाडू आहे. विराट आणि धोनीने भारतीय संघासाठी आतापर्यंत अनेक सामने खेळले आहेत. गेल्या वर्षभरात धोनी त्याच्या संथ खेळीमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर होता, मात्र अशा परिस्थितीतही कोहलीने धोनीला आपला पाठींबा दिला. धोनी हा मोठा खेळाडू आहे आणि संघाला त्याची गरज आहे हे कोहली वारंवार सांगत राहिला. क्रिकेटमध्ये फार कमी कर्णधार अशा पद्धतीने एखाद्या खेळाडूला पाठींबा देतात. इतक्या मोठ्या कालावधीमध्येही विराटने धोनीला इकटं सोडलं नाही याचं मला कौतुक वाटतं. हा समजुतदारपणा विराटला मोठं बनवतो.” India TV वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुली बोलत होता.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या चेतेश्वर पुजाराच्या मनात एका गोष्टीची खंत कायम

वन-डे मालिकेतल्या बहारदार कामगिरीसाठी धोनीला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. 8 वर्षातलं धोनीचं हे पहिलं मालिकावीराचं बक्षीस ठरलं. 2011 साली इंग्लंड दौऱ्यात धोनीला अखेरचं मालिकावीराचा किताब मिळाला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे. 23 जानेवारीपासून दोन्ही संघांमध्ये 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.

अवश्य वाचा – जागतिक क्रिकेटमध्ये दरारा निर्माण करण्यात भारत यशस्वी – डीन जोन्स

Story img Loader