प्रत्येक गोष्टीमध्ये तुलना ही होतच असते, मग ते सामान्य आयुष्य असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील एखादी व्यक्ती. महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यावर विराट कोहलीला भारताचे कर्णधारपद मिळाले आणि पुन्हा एकदा या दोघांमध्ये तुलना करायला सुरुवात झाली; पण या दोघांमध्ये तुलना करू नये, असे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला वाटते. कोहली हा अनुभवांनी अधिक परिपक्व होईल, असे मत गांगुलीने व्यक्त केले आहे.
‘‘सध्याच्या घडीला धोनी आणि कोहली यांची तुलना करण्यात येत आहे. माझ्या मते या दोघांची तुलना होऊ शकत नाही आणि ही तुलना करणे उचित ठरणार नाही,’’ असे गांगुली म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, ‘‘कोहलीला आताच कर्णधारपद मिळाले आहे. त्याच्याकडे नेतृत्वक्षमता आहे. तो आक्रमक आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी जिंकण्याची ईर्षां आहे, त्यामुळेच तो एक चांगला कर्णधार होऊ शकतो. त्याच्यामध्ये एक जिद्द आहे आणि ती मैदानावरही दिसते. त्यामुळे जसे त्याच्या गाठी अनुभव जमा होतील, तसा तो अधिक परिपक्व होत जाईल.’’
धोनीच्या निवृत्तीनंतर कोहलीला कर्णधारपद भूषवण्यासाठी फार कमी कालावधी मिळाला आणि त्याला कर्णधार म्हणून जास्त सामनेही खेळता आलेले नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अ‍ॅडलेड आणि सिडनीमधील दोन कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने कर्णधारपद भूषवले; पण तरीही या दोन सामन्यांमधील कोहलीचे नेतृत्व गांगुलीला भावले आहे. भारताने ही मालिका गमावली असली तरी या मालिकेत भारताकडून आक्रमक वृत्ती पाहायला मिळाली. भारताला या मालिकेत आलेले अपयश हे गोलंदाजीमुळे आले असल्याचे गांगुलीला वाटते.
‘‘या मालिकेत गोलंदाजीमध्ये सातत्य नव्हते. चेंडूची दिशा आणि टप्पा कसा असावा ही गोष्ट आंतरराष्ट्रीय दर्जावर पोहोचल्यावर गोलंदाजांना माहिती असायला हवी, हे फार महत्त्वाचे असते. जोश हॅझेलवूडने पाचव्या दिवशी अप्रतिम मारा केला. त्याने आठ षटकांमध्ये अवघ्या तीन धावा दिल्या. त्याने चेंडूची दिशा आणि टप्पा योग्य ठेवला होता आणि हीच गोष्ट गोलंदाजीचा पाया आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये गुणवत्ता आणि वेग आहे, पण सातत्य आणि शिस्त नाही. गोलंदाजीसाठी शिस्त फार महत्त्वाची असते. मला अशी आशा आहे की, त्याच्याबरोबर असलेल्या काही अनुभवी व्यक्ती त्यांना या गोष्टी सांगतील आणि ते यामधून बरेच काही शिकतील,’’ असे गांगुली म्हणाला.

Story img Loader