भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी एका अल्पवयीन कुस्तीपटूसह एकूण सात महिला कुस्तीगिरांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत. ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी करत देशातील आघाडीचे कुस्तीगीर २३ एप्रिलपासून जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला देशपातळीवरून पाठिंबा मिळत आहे. परंतु, अद्यापही क्रीडा क्षेत्रातील इतर अनेक मान्यवरांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला नाही. याप्रकरणावर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यानेही प्रतिक्रिया दिली आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
“या विषयावर बोलण्यासाठी हे योग्य व्यासपीठ नाही. पण, त्यांना त्यांची लढाई लढू द्या. तिथे काय होतंय हे मला खरंच माहीत नाही. मी फक्त वर्तमानपत्रात वाचलं आहे. क्रीडाजगतात एक गोष्ट मला समजली आहे की ज्याबद्दल आपल्याला माहीत नाही त्याबद्दल बोलू नये. हे लवकरच संपेल. कुस्तीगीरांनी आपल्या भारतासाठी अनेक पदके आणली आहे. त्यामुळे हे लवकरच संपेल अशी आशा करतो”, असं सौरव गांगुली म्हणाले.
दरम्यान, ब्रिजभुषण शरण सिंह यांना शिक्षा होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. “आम्ही जिंकलेली सर्व पदके आणि पुरस्कार सरकारला परत देण्यास तयार आहोत. आम्हाला अशा प्रकारची वागणूक मिळत असेल, तर या पदकांचा आणि पुरस्कारांचा काय उपयोग”, असा सवालही आंदोलक कुस्तीगीर विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काल (४ मे) उपस्थित केला.
हेही वाचा >> पदके, पुरस्कार परत करण्याची तयारी! दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलक कुस्तीगिरांचा इशारा
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर; पण आंदोलन सुरू ठेवणार!
ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तीन महिला कुस्तीगिरांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात तक्रारदारांना पुरेशी सुरक्षा पुरवण्यात आली आहे, याकडे सर्वोच्च न्यायालयाने लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर असला, तरी आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका कुस्तीगिरांनी स्पष्ट केली आहे. ‘‘सर्वोच्च न्यायालयाने जे केले, त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला नव्हता; परंतु सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आणि गुन्हा नोंदवला गेला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आमच्यासाठी धक्का नाही. आमच्याकडे विविध पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवू,’’ असे विनेश फोगट म्हणाल्या.