जिगरबाज खेळ आणि खंबीर नेतृत्वाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाला नवी ओळख मिळवून देणारा सौरव गांगुली आता आपली कारकीर्द शब्दबद्ध करणार आहे. सोमवारी गांगुलीने ४१व्या वर्षांत पदार्पण केले. वडिलांच्या निधनामुळे सौरवने हा वाढदिवस साजरा केला नाही, मात्र वाढदिवसानिमित्ताने आपले मनोगत जरूर प्रकट केले. प्रतिस्पर्धी संघाच्या अरेरावीला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याची मानसिकता गांगुलीने विकसित केली. बेडर, बिनधास्त, परंतु संघहितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय सौरवने घेतले. इंग्लंडचा क्रिकेटपटू अॅन्ड्रय़ू फ्लिंटॉफने भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर शर्ट उतरवून आनंद साजरा केला. याच इंग्लंड संघाविरुद्ध तिरंगी मालिकेत ३२६ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य गाठत भारतीय संघाने लॉर्ड्सवर इतिहास रचला. त्या वेळी फ्लिंटॉफला प्रत्युत्तर म्हणून सौरवने शर्ट उतरवून जल्लोष साजरा केला. सौरवच्या कालखंडातील या स्वरूपाच्या अनेक उत्कंठावर्धक घटना, किस्से याविषयी भारतीय क्रिकेटरसिकांना वाचायला मिळणार आहे.
नेहमीच्या शैलीप्रमाणे आपल्या आत्मचरित्रातही सौरव बिनधास्त फटकेबाजी करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 ‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर आत्मचरित्र लिहिण्याचा विचार केला होता. मात्र आयपीएल, समालोचन यामुळे लिखाणासाठी वेळच मिळाला नाही, पण आता वेळ मिळणार आहे. त्यामुळे लवकरच मी लिहायला सुरुवात करणार आहे,’’ असे सौरवने सांगितले.
‘‘हे आत्मचरित्र कशा स्वरूपाचे असेल, याबाबत विचार केलेला नाही. मात्र जे काही लिहीन ते सत्यच असेल. लिहायला सुरुवात केल्यानंतरच स्वरूपाविषयी सविस्तरपणे बोलू शकेन,’’ असे गांगुलीने स्पष्ट केले.

Story img Loader