सध्या भारतीय क्रिकेटमध्ये विविध गोष्टींमुळे गदारोळ माजला आहे. विराट कोहलीला भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्यानंतर विविध गोष्टी, चर्चांना उधाण आले. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या प्रतिक्रियेविरुद्ध उत्तर देत विराटने अनेक गौप्यस्फोट केले. त्यानंतर गांगुलीनेही योग्य वेळी उत्तर दिले जाईल, असा संकेत दिला. या सर्व गोष्टींच्या विपरित गांगुलीने अनेक विषयांवर चर्चा केली. क्रीडा पत्रकार बोरिया मजूमदार यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान त्याने अनेक गोष्टींची दिलखुलास उत्तरे दिली. यादरम्यान त्याने सचिन तेंडुलकरबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर दिले.

बॅकस्टेज विथ बोरिया या कर्यक्रमात गांगुली बोलत होता. राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएल लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर हे भारतीय क्रिकेटचे आधारस्तंभ समजले जात होते. यापैकी गांगुली आता बीसीसीआय अध्यक्ष, द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे. आता सचिन आणि सेहवाग भारतीय क्रिकेटमध्ये सेवा देण्यासाठी सज्ज आहेत का, असा सवाल गांगुलीला करण्यात आला.

हेही वाचा – “तिला याबद्दल काहीच माहीत नाही”, पाकिस्तानी नवऱ्यानं सर्वांसमोर सांगितली ‘अशी’ गोष्ट, जी ऐकून सानियाला येणार प्रचंड राग!

या प्रश्नाचे उत्तर देताला गांगुली म्हणाला, ”सचिन हा पूर्णत: वेगळा आहे. मला वाटते, की त्याला या सर्वात पडायचे नाही. पण भारतीय क्रिकेटमध्ये सचिनचा सहभाग, यापेक्षा दुसरी चांगली बातमी असू शकत नाही. पण सध्या हितसंबंधाबाबत जगभरात जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे तुम्ही काहीही कराल तेव्हा तुमच्यावर प्रश्न निर्माण होतील. सर्वात गुणवान प्रतिभेचा शोध घेणे, हे आपल्याला सुरुच ठेवावे लागेल. आणि एका स्तरावर सचिनही भारतीय क्रिकेटचा भाग होण्याचा मार्ग शोधेल.”

सचिनची कारकीर्द

सचिनने २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. त्याने आपल्या २४ वर्षांच्या कारकीर्दीत २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय सामने आणि एक टी-२० सामना खेळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ३४ हजाराहून अधिक धावा केल्या. कसोटीत सचिनने ५१ शतकांसह १५९२१ तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतकांसह १८४२६ धावा केल्या. दोन्ही स्वरूपात तो सर्वाधिक धावा करणारा आहे.