Sourav Ganguly Explains Why India Didn’t Win ICC Trophy: टीम इंडिया २०१३ पासून आयसीसी टूर्नामेंटमध्ये सतत अपयशी ठरत आहे. अलीकडेच, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला होता. आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टीम इंडिया आयसीसी टूर्नामेंटमध्ये का अपयशी ठरत आहे, याचे उत्तर दिले आहे. भारतीय संघाने शेवटची आयसीसी ट्रॉफी २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपाने जिंकली होती.
दुसरीकडे, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली ‘रेवस्पोर्ट्स’शी बोलताना म्हणाला की, टीम इंडियाच्या पराभवाचे कारण मानसिक आरोग्य नसून एग्जीक्यूशन आहे. सौरव गांगुली म्हणाला, “बऱ्याचदा आपण महत्त्वाच्या प्रसंगी चांगली कामगिरी करत नाही. काही मानसिक दडपण आहे, असे मला वाटत नाही. हा सगळा एग्जीक्यूशनचा खेळ आहे. खेळाडू मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहेत. लवकरच ते ही रेषाही पार करतील अशी अपेक्षा आहे.”
माजी कर्णधार सौरव गांगुली पुढे म्हणाला, “हो, नेहमीच आशा असते. किमान आपण डब्ल्यूटूसी फायनलसाठी तरी पात्र ठरलो होतो, ही देखील एक उपलब्धी आहे. आपल्याकडे संधी आहे, आपल्याकडे चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे आशा आहे की आपण ते करु.”
हेही वाचा – IND vs WI: पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहलीने जिममध्ये गाळला घाम, PHOTOS आणि VIDEO होतायेत व्हायरल
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही स्पर्धा भारतात होणार आहे –
एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही स्पर्धा भारतात आयोजित केली जात आहे. त्यामुळे चाहत्यांना घरच्या मैदानावर संघाकडून आयसीसी ट्रॉफीची अपेक्षा असेल. या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून १९ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. विश्वचषकात एकूण ४८ सामने खेळले जाणार आहेत.
याआधी २०१९ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचवेळी २०१५ च्या विश्वचषकात टीम इंडियाला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले होते.