नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला ४-१ अशी हार पत्करावी लागली. त्यानंतर भारतीय संघावर प्रचंड टीका झाली. इतकेच नव्हे तर भारतीय संघ निवड समिती आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आली. पण असे असले तरीही भारतीय संघालाच या स्पर्धेसाठी पसंती असेल, असे मत माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले आहे.
गांगुली म्हणाला की कर्णधार विराट कोहलीची संघातील अनुपस्थिती नक्कीच जाणवेल. पण रोहित शर्मावर मला विश्वास आहे. तो संघाचे कौशल्यपूर्ण पद्धतीने नेतृत्व करू शकेल. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेसाठी क्रिकेटरसिकांची पहिली पसंती ही भारतीय संघालाच असेल.
भारतीय संघ इंग्लंडमध्ये समाधानकारक कामगिरी करू शकला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ अधिक भक्कम असतो. या दोनही गोष्टी खऱ्या असल्या तरीही रोहित शर्माचे कर्णधार म्हणून रेकॉर्ड उत्तम आहे. त्यामुळे तो या स्पर्धेत कर्णधार आणि खेळाडू म्हणून चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षादेखील गांगुलीने व्यक्त केली.
आशिया चषकामध्ये भारताचा पहिला सामना १८ सप्टेंबर रोजी हाँगहाँग संघासोबत होणार आहे. तर १९ सप्टेंबर रोजी भारत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. २०१६ मध्ये झालेल्या आशिया चषकावर भारतीय संघाने नाव कोरले होते. भारताने आतापर्यंत सहा वेळा आशिया चषकावर नाव कोरले आहे. यामध्ये पाच एकदिवसीय आणि एक टी-२० फॉर्मेंट होते. भारतीय संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे.