आयपीएल संपल्यावर आता भारतीय संघ काही दिवसांमध्ये बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण या दौऱ्यावर जाताना भारतीय संघाचा प्रशिक्षक कोण असेल, याबाबत मात्र अजूनही निर्णय झालेला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) प्रशिक्षक निवडण्याच्या तयारीला लागले आहे, पण निवड होईपर्यंत संघाला बांगलादेश दौऱ्यावर अनुभवी माजी खेळाडूंबरोबर पाठवण्याचे बीसीसीआयने ठरवले आहे. त्यासाठी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला बांगलादेश दौऱ्यावर कामगिरी उंचावण्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आयपीएलच्या अंतिम फेरीच्या निमित्ताने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या बैठकी सुरू  आहेत. आयपीएल संपल्यावर आता भारतीय संघापुढे बांगलादेश दौऱ्याचे आव्हान असणार आहे. पण या दौऱ्यावर जाताना संघाबरोबर प्रशिक्षक नसेल. कारण डंकन फ्लेचर यांचा करार संपुष्टात आला असून त्यांना मुदतवाढ न देण्याचे बीसीसीआयने ठरवले आहे. या परिस्थितीमध्ये संघाला मार्गदर्शन करण्यासाठी गांगुलीची उच्च कामगिरी व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अजून कोणताही अधिकृत निर्णय झाला नसला तरी येत्या काही दिवसांमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशच्या कामगिरीमध्ये लक्षणीय सुधारणा पाहायला मिळाली आहे. विश्वचषक आणि मायदेशातील मालिकांमध्ये बांगलादेशने दमदार कामगिरी केली आहे. दिग्गज संघांच्याही तोंडचे पाणी त्यांनी पळवले आहे. त्यामुळेच भारतीय संघाने हा दौरा गंभीरपणे घेतला आहे. या दौऱ्यावर जाताना संघाला प्रशिक्षक नसताना अनुभवी खेळाडूचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी बीसीसीआयने गांगुलीची निवड केली आहे.
सौरवच्या या नवीन पदाबाबतची घोषणा सोमवारी करण्यात येऊ शकते. भारतीय संघाबरोबर गांगुली जाणार असला तरी साहाय्यक प्रशिक्षकांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. संजय बांगर आणि भारत अरुण हे दोघेही भारतीय संघाबरोबर या दौऱ्यावर जाणार आहेत.

Story img Loader