टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याच्याबद्द्ल सध्या खूप चर्चा केली जात आहे. कारण हा व्हिडिओ पाहून लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सौरव गांगुलीने ५ सेकंदाचा हा व्हिडिओ नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर केला आहे.
सौरव गांगुलीने शेअर केलेल्या व्हिडिओत तो फलंदाजी करताना दिसत आहे. ज्यामध्ये तो मोठ-मोठे फटके मारताना दिसत आहे. या व्हिडिओच्या शेवटी कमिंग सून असे लिहले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहून लोक असा अंदाज लावत आहेत की, सौरव गांगुलीचा बायोपिक येणार आहे. कमिंग सून का लिहिलंय हे दादांनी स्पष्ट केलेले नाही. टीम इंडियाच्या माजी कर्णधारावर हिंदीत बायोपिक बनणार असल्याच्या अनेक बातम्या याआधी समोर आल्या आहेत. गांगुलीच्या आधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीसह टीम इंडियाच्या अनेक क्रिकेटर्सवर बायोपिक बनवले गेले आहेत.
सौरव गांगुलीची कर्णधारपदापासून ते बीसीसीआयच्या अध्यक्षपदापर्यंतची कारकीर्द खूप रंजक राहिली आहे. बीसीसीआयच्या ६५ वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदी विराजमान होणारा तो पहिला क्रिकेटपटू होता. तो २०१९ मध्ये बीसीसीआयचा अध्यक्ष झाला. त्याचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२२ मध्ये संपला.
दरम्यान सौरव गांगुलीला अध्यक्ष म्हणून दुसरी टर्म मिळाली नाही. दादाने टीम इंडियाचे कर्णधारपद अशा वेळी सांभाळले, जेव्हा मॅच फिक्सिंगचे ढग दाटून आले होते. यानंतर त्याने संघाला अव्वल स्थानावर नेले. २००३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला. माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्याशी झालेल्या वादानंतर त्याने कर्णधारपद गमावले.
सौरव गांगुलीची कारकीर्द –
सौरव गांगुलीच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने ११३ कसोटी सामन्यांमध्ये ४२.१७ च्या सरासरीने ७२१२ धावा केल्या. यादरम्यान त्याने १६ शतके आणि ३५ अर्धशतके झळकावली. तसेच ३११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४१.०२ च्या सरासरीने ११३६३ धावा केल्या. यादरम्यान त्याने २२ शतके आणि ७२ अर्धशतके झळकावली. त्याने कसोटीत ३२ आणि एकदिवसीय सामन्यात १०० बळी घेतले.