वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रणजी क्रिकेटमध्ये भरघोस धावा करणाऱ्या सरफराज खानला पुन्हा एकदा संधी मिळाली नाही. काही माजी क्रिकेटपटूंनीही यावर जोरदार टीका केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये स्थान मिळवण्यासाठी ऋतुराज गायकवाड सारखा रणजी नव्हे तर आयपीएलमध्ये चांगला हंगाम हवा, असे काही क्रिकेटपटूंनी म्हटले आहे. मात्र, गांगुली या मताशी सहमत नाही. यासोबतच त्याने सरफराजलाही साथ दिली आहे.
सरफराजसारख्या दिग्गज फलंदाजाने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली नसली तरी त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळायला हवी, असे गांगुलीने म्हटले आहे. सरफराज आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत होता. गांगुली या संघाचा संचालक आहे. तो म्हणाला, “मला वाटते यशस्वी जैस्वालने रणजी ट्रॉफी, इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफीमध्ये खूप धावा केल्या आहेत, म्हणूनच तो संघात आहे.”
गांगुली याबाबत बोलताना पुढे म्हणाला, “सरफराज खान कोणत्या परिस्थितीतून जात असेल हे मला माहित आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा करण्याची संधी मिळाली पाहिजे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने गेल्या तीन वर्षांत खूप धावा केल्या आहेत. मी अभिमन्यू ईश्वरनबद्दलही हेच सांगू इच्छितो की त्याने गेल्या पाच-सहा वर्षांत खूप धावा केल्या आहेत. मला आश्चर्य वाटते की दोघांनाही संधी मिळाली नाही, पण भविष्यात त्यांना संधी मिळायला हवी. यशस्वी जैस्वाल ही एक चांगली निवड आहे.”
गांगुलीने सरफराजला दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक म्हणून जवळून पाहिले आहे आणि सरफराज वेगवान गोलंदाजी खेळू शकत नाही या तर्कावर तो नाराज आहे. तो म्हणाला, “तुम्हाला त्याच्या कौशल्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही जर तुम्ही सरफराजला फास्ट बॉलिंगविरुद्ध खेळताना पाहिले नसेल तर तुम्हाला कसे कळेल? त्याला काही अडचण असती तर भारताच्या प्रत्येक मैदानावर त्याने इतक्या धावा केल्या नसत्या. माझा स्वत:ला त्याच्यावर विश्वास आहे की त्याला वेगवान गोलंदाजी विरुद्ध कोणतीही अडचण नाही आणि त्याला संधी दिली पाहिजे.”
सरफराज खान मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो आणि २०२० पासून संघासाठी सातत्याने कामगिरी करत आहे. २०२२-२३ हंगामात, सरफराजने सहा सामन्यांत 92.६६ च्या सरासरीने ५५६ धावा केल्या, ज्यात तीन शतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, २०२१-२२ हंगामातील सहा सामन्यांमध्ये त्याने १२२.७५ च्या सरासरीने ९८२ धावा केल्या, ज्यात चार शतकांचा समावेश आहे. २०१९-२० हंगामात, सरफराजने मुंबईसाठी सहा सामन्यांमध्ये १५४.६६ च्या प्रभावी सरासरीने ९२८ धावा केल्या, ज्यात तीन शतकांचा समावेश आहे. याचा अर्थ सरफराजने एकूण १० शतके झळकावली आहेत. तीन देशांतर्गत हंगामात त्याच्या नावावर २४६६ धावा आहेत, हा एक मोठा विक्रम आहे. गेल्या तीन हंगामात असा पराक्रम करणारा त्याच्याशिवाय दुसरा कोणताही फलंदाज नाही.