Sourav Ganguly ‘Z’ Category: पश्चिम बंगाल सरकारने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी सरकार आता गांगुलीला झेड श्रेणीची सुरक्षा देणार आहे. नवीन सुरक्षा व्यवस्थेनुसार बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांवर आठ ते दहा पोलिसांचा पहारा असेल. ‘वाय’ श्रेणी सुरक्षा कवचाखाली गांगुलीला तीन पोलिसांचे रक्षण होते. बेहाला येथील त्याच्या निवासस्थानी तितक्याच संख्येने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पहारा यापुढे देतील. मात्र, क्रिकेटच्या दादाला एवढी सुरक्षा का देण्यात आली यामागील कारण बंगाल सरकारकडून सांगण्यात आले आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीला पश्चिम बंगाल सरकारने झेड श्रेणीची सुरक्षा दिली आहे. गांगुलीला आधीच ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा होती. मात्र आता त्यात सुधारणा करण्यात आली आहे. त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गांगुली सध्या आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचे क्रिकेट संचालकपद सांभाळत आहे. माजी कर्णधार गांगुलीने राज्य किंवा केंद्र सरकारकडे कोणतीही विनंती नव्हती, परंतु पश्चिम बंगाल सरकारच्या प्रशासकीय कार्यालयाने ती मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.
गांगुलीची सुरक्षा का वाढवली?
बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांना यापूर्वी ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा होती. त्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी (१६ मे) सरकारने गांगुलीची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला. बंगाल सरकारच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “व्हीव्हीआयपी सुरक्षा संपल्यानंतर प्रोटोकॉलनुसार आढावा घेण्यात आला. त्यानंतर गांगुलीची सुरक्षा ‘झेड’ श्रेणीत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तो बंगाल आणि भारताचा मुख्य खेळाडू आहे म्हणून त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली”, अशी माहिती दिली आहे.
अधिकारी गांगुली यांच्या कार्यालयात पोहोचले
मंगळवारी, राज्य सचिवालयाचे प्रतिनिधी गांगुली यांच्या बेहाला कार्यालयात पोहोचले, जिथे त्यांनी कोलकाता पोलिस मुख्यालय लालबाजार आणि स्थानिक पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. “गांगुली सध्या त्याच्या टीम दिल्ली कॅपिटल्ससह प्रवास करत आहे आणि २१ मे रोजी कोलकाता येथे परत येईल. त्या दिवसापासून त्याला ‘झेड’ श्रेणी सुरक्षा मिळण्यास सुरुवात होईल,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
बंगालमध्ये कोणाची सुरक्षा आहे?
पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल सीव्ही आनंद बोस, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि राष्ट्रीय सचिव अभिषेक बॅनर्जी यांना झेड प्लस सुरक्षा मिळते. फिरहाद हकीम आणि मोलॉय घटक या मंत्र्यांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. भाजपच्या पश्चिम बंगालच्या अध्यक्षा सुकांता मजुमदार यांना सीआयएसएफ सुरक्षेसह झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.