फुटबॉलमध्ये विश्वविजेतेपदाचे स्वप्न पाहण्यापेक्षाही ते जगणे अधिक महत्त्वाचे असते. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी उत्कृष्ट सांघिक समन्वय, गोल करण्याची अचूकता व संयमपूर्ण खेळ याची आवश्यकता असते. दुर्दैवाने एकमेकांवरील विश्वासाचा अभाव, खेळापेक्षाही पैशाच्या लालसेस जवळ करण्याची वृत्ती व दांडगाईचा खेळ यामुळे दक्षिण आफ्रिकेतील संघांची विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक झाली.
फुटबॉलमध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविण्यासाठी आवश्यक असणारे क्रीडानैपुण्य आफ्रिकन संघांमध्ये निश्चित आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी कॅमेरून, नायजेरिया, घाना, अल्जेरिया व आयव्हरी कोस्ट हे पाच संघ आफ्रिका गटातून पात्र ठरले होते. नायजेरिया व अल्जेरिया यांनी बाद फेरीत स्थान मिळवीत मोठय़ा आशा निर्माण केल्या होत्या. नायजेरिया संघाला बाद फेरीत फ्रान्सविरुद्धच्या लढतीत अतिरिक्त वेळेत पराभूत व्हावे लागले. अल्जेरियाने प्रथमच बाद फेरीत स्थान मिळवीत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांना जर्मनीविरुद्धच्या बाद फेरीच्या लढतीत १-२ असा अतिरिक्त वेळेत पराभव स्वीकारावा लागला. कॅमेरून, घाना व आयव्हरी कोस्ट यांचे आव्हान साखळी गटातच संपुष्टात आले.
आफ्रिकन संघांना आर्थिक समस्यांना अनेक वेळा सामोरे जावे लागले आहे. मानधन वेळेवर न मिळणे, करारात नमूद केलेल्या सवलती व सुविधा न मिळणे, आदी अनेक कारणांस्तव आफ्रिकन संघांनी आपल्या देशांच्या महासंघांविरुद्ध अनेक वेळा आंदोलने केली आहेत. यंदा विश्वचषक स्पर्धेपूर्वीही कॅमेरून, नायजेरिया, घाना या देशांच्या खेळाडूंनी ऐन वेळी बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतला होता. कॅमेरून संघातील खेळाडू व कॅमेरून फुटबॉल महासंघ यांच्यात गेले अनेक महिने आर्थिक मानधनावरून वादंग सुरू आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वी खेळाडूंना त्यांची आर्थिक मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाले होते, मात्र स्पर्धेसाठी रवाना होण्याच्या दिवसापर्यंत ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे कॅमेरून खेळाडूंनी विमानात बसण्यास नकार दिला. कॅमेरून सरकारने मध्यस्थी करीत खेळाडूंची मागणी काही अंशी पूर्ण केली. त्यामुळे कॅमेरूनच्या खेळाडूंनी बहिष्कार मागे घेतला. अर्थात ज्या प्रकारे त्यांनी या स्पर्धेतील साखळी गटाचे तीनही सामने गमावले, ते पाहता त्यांच्या पराभवाचे कारण केवळ त्यांची खराब कामगिरी नसून खेळाडूंची नकारात्मक मानसिकता आहे. या खेळाडूंनी आपल्या महासंघाला अद्दल घडावी, या हेतूने जाणीवपूर्वक खराब खेळ केला असावा. त्यांच्या खेळाडूंनी सामन्याचे निकाल निश्चित केले असावेत अशी साशंकता निर्माण झाली आहे. कॅमेरून फुटबॉल महासंघाचे पदाधिकारी याबाबत आता चौकशी करीत आहेत.
फाजील आत्मविश्वास कधी कधी घातक ठरतो असे म्हटले जाते. घाना संघाबाबत असेच म्हणावे लागेल. त्यांचे प्रशिक्षक क्वेझी अप्पेहा यांनी आपण विश्वविजेते होणार आहोत असाच आत्मविश्वास खेळाडूंवर सतत बिंबविला होता. मात्र त्यामुळेच त्यांच्या खेळाडूंची कामगिरी खराब झाली. त्यातच त्यांच्या केव्हिन बोटेंग व सुलेह मुन्तारी यांनी पंचांशी हुज्जत घातल्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. घाना संघातही मानधनावरून खदखद सुरू होती. मानधनाच्या प्रश्नावरून खेळाडू ऐन वेळी मैदानावर उतरणार नाहीत अशी भीती वाटल्यामुळे घानाच्या फुटबॉल संघटकांनी ब्राझीलकडे धाव घेत तेथे आपल्या संघातील खेळाडूंना मानधनाचे वाटप केले.
खेळाडू व संघटक यांच्यातील मतभेदाबाबत नायजेरिया संघही अपवाद नव्हता. मात्र त्यांच्या खेळाडूंनी बहिष्काराचे साधन वापरले नाही. नायजेरियाने बाद फेरीत स्थान मिळविले. त्यांनी फ्रान्ससारख्या मातब्बर संघाला चांगली लढत दिली. तथापि, त्यांना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविता आले नाही.
अल्जेरिया संघाने प्रथमच या स्पर्धेत बाद फेरीत स्थान मिळवीत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी जर्मनीसारख्या बलाढय़ संघाला अक्षरश: रडविले. त्यांच्या खेळाडूंनी दांडगाईच्या खेळाऐवजी नियोजनपूर्वक खेळ केला असता तर निश्चित ते उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले असते.
विश्वचषक स्पर्धा व्यावसायिक फुटबॉल क्षेत्राची पायाभरणी मानली जाते. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत व्यावसायिक क्षेत्रात आपला भाव वधारण्यासाठी आफ्रिकन खेळाडू उत्सुक असतात, मात्र विजेतेपद मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विजिगीषु वृत्तीच्या अभावामुळे त्यांची धाव मर्यादितच राहिली.