भारत अ संघाविरुद्ध तिरुअनंतपुरम येथे सुरु असलेल्या अनौपचारिक वन-डे सामन्यांच्या मालिकेत आफ्रिका अ संघाने पहिल्या विजयाची नोंद केली आहे. चौथ्या वन-डे सामन्यात आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर ४ धावांनी बाजी मारली. मालिकेत भारत संघ सध्या ३-१ अशा विजयी आघाडीवर आहे. तळातल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारताने सामना गमावला.

नाणेफेक जिंकून भारत अ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पावसाने आणलेला व्यत्यय आणि खेळपट्टी ओलरस राहिल्यामुळे सामना २५ षटकांचा खेळवण्यात आला. रेझा हेंड्रीग्ज, हेन्रिच क्लासेन आणि मॅथ्यू ब्रित्झ्के यांनी फटकेबाजी करत आफ्रिकेला १३७ धावांचा टप्पा गाठून दिला. हेंड्रिग्जने नाबाद ६० धावांची खेळी केली. भारताकडून राहुल चहरने एकमेव बळी घेतला.

डकवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर २५ षटकात १९३ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाने चांगली सुरुवात केली होती. सलामीवीर शिखर धवनने अर्धशतकी खेळी करत भारताची बाजू भक्कम केली. मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय फलंदाजांनी विकेट गमावल्या, त्यातच मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट गमावल्यामुळे आफ्रिकेचा संघ अखेरच्या षटकांत वरचढ ठरला. अखेरीस ४ धावांनी सामन्यात बाजी मारत आफ्रिका अ संघाने आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. आफ्रिकेकडून नॉर्ट्जे, जान्सेन आणि सिंपाला यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले.

Story img Loader