भारतीय क्रिकेट संघात एखाद्या खेळाडूला आपलं स्थान निर्माण करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या देशात राष्ट्रीय संघात जागा मिळवणं खूप मोठं आव्हानच आहे. यामुळेच आपल्या देशातील अनेक तरुणांचं एक मोठा क्रिकेटर होण्याचं स्वप्न अनेकदा अपूर्णच राहतं. याच पार्श्वभूमीवर दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने एक विधान केलं आहे.

डिव्हिलियर्सने इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पॉडकास्टमध्ये बोलताना हे वक्तव्य केलं आहे. यावेळी डिव्हिलियर्सने जर आपला जन्म भारतात झाला असता तर कदाचित राष्ट्रीय संघात जागा मिळवू शकलो नसतो असं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं माझं स्वप्नच राहिलं असतं असं डिव्हिलियर्स म्हणतो. भारतीय संघात आपली जागा निर्माण करणं सोपी गोष्ट नसून यासाठी भारतीय खेळाडूंचा आदर केला पाहिजे असंही मत त्याने मांडलं आहे.

“भारतीय संघात खेळण्यासाठी तुम्हाला विशेष असावं लागेल”

डिव्हिलियर्सने सांगितलं की, “गेल्या १५ वर्षांमध्ये आयपीएल क्रिकेट, भारतीय प्रेक्षक आणि भारतीय लोकांच्या काम करण्याची पद्धतीचा मी अनुभव घेतला आहे. भारतात जन्म होणं आणि मोठं होणं थोडं मजेशीर आहे. कोणाला माहित, मी भारतात जन्मलो असतो तर कदाचित राष्ट्रीय संघाकडून खेळू शकलो नसतो. भारतीय संघात सामील होणं खूपच आव्हानात्मक आहे. त्यासाठी तुम्हाला विशेष खेळाडू असावं लागेल”.

२००८ पासून आयपीएल खेळतोय डिव्हिलियर्स

एबी डिव्हिलियर्सने आतापर्यंत १८४ आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३९.७० च्या सरासरीने ५१६२ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरनंतर सर्वाधिक धावा करणारा डिव्हिलियर्स दुसऱा खेळाडू आहे. डिव्हिलियर्स आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून म्हणजेच २००८ पासून आयपीएल खेळत आहे. पण यावेळी आरसीबीने त्याला रिलीज केलं आहे. पुढील हंगामात डिव्हिलियर्स नव्या संघाकडून खेळताना दिसू शकतो. सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंमध्ये डिव्हिलियर्स एकमेव विदेशी खेळाडू आहे.

Story img Loader