JP Duminy batting coach comes out to field South Africa vs Ireland: उकाड्यामुळे खेळाडूंची दमछाक उडून त्यांनी ड्रेसिंगरुम गाठल्याने फिल्डिंग कोचला फिल्डिंगसाठी मैदानावर उतरावं लागल्याची घटना अबू धाबी इथे पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडेदरम्यान दक्षिण आफ्रिकेचे बॅटिंग कोच जेपी डयुमिनी मैदानात उतरला. खेळाडू म्हणून खेळत असताना जागतिक स्तरावरील अफलातून चपळ क्षेत्ररक्षकांमध्ये ड्युमिनीची गणना व्हायची. निवृत्ती स्वीकारल्यानंतर ड्युमिनी आता दक्षिण आफ्रिका संघाचा बॅटिंग कोच आहे. फिल्डिंगला उतरल्यानंतर अवघ्या काही मिनिटात ड्युमिनीच्या दिशेने चेंडू आला. चेंडू वेगाने जात असताना ड्युमिनीने चित्त्यासारखी झडप घालत चेंडूला रोखलं आणि चौकार वाचवला. ड्युमिनीचं चापल्य पाहून खेळाडूंनी त्याला शाबासकी देण्यासाठी धाव घेतली. ड्युमिनीच्या फिल्डिंगचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

अबू धाबीत पाऱ्याने पस्तिशी ओलांडली होती. ३६ डिग्री वातावरणात खेळणं दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसाठी कठीण झालं. दक्षिण आफ्रिकेने या मालिकेसाठी काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती. तेंबा बावूमा दुखापतीमुळे तिसऱ्या वनडेत खेळू शकला नाही. वैयक्तिक कारणांसाठी विआन मुल्डर मायदेशी परतला. यामुळे राखीव खेळाडूंपैकी काहींना अंतिम अकरात संधी देण्यात आली. प्रचंड उकाड्यामुळे काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने संघव्यवस्थापनाने जेपी ड्युमिनीला पाठवण्याचा निर्णय घेतला. ड्युमिनीने उकाड्याची पर्वा न करता लौकिकाला साजेसं क्षेत्ररक्षण केलं. ४६ टेस्ट, १९९ वनडे आणि ८१ टी२० नावावर असलेल्या ड्युमिनीने निवृतीनंतरही उत्तम फिट असल्याचं दाखवून दिलं.

आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार पॉल स्टर्लिंगच्या ८८ धावांच्या खेळीच्या बळावर आयर्लंडने २८४ धावांची मजल मारली. स्टर्लिंगने ८ चौकार आणि ३ षटकारांसह शानदार खेळी साकारली. हॅरी टेक्टरने ६० धावा करत त्याला चांगली साथ दिली. अँडी बलर्बिनीने ४५ तर कुर्टीस कॅम्फरने ३४ धावा केल्या. आफ्रिकेतर्फे लिझाड विल्यम्सने ४ विकेट्स घेतल्या.

या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. दुसरीच वनडे खेळणाऱ्या जेसन स्मिथच्या ९१ धावांचा अपवाद वगळता आफ्रिकेच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. स्मिथने ९ चौकार आणि ४ षटकारांसह संयमी खेळी केली. आयर्लंडकडून ग्रॅहम ह्यूम आणि क्रेग यंग यांनी प्रत्येकी ३ विकेट्स पटकावल्या. मार्क अडेअरने २ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिकेने दोन सामने जिंकत तीन सामन्यांची मालिका जिंकली होती. निर्भेळ विजयासाठी आफ्रिकेचा संघ प्रयत्नशील होता. मात्र आयर्लंडने तिन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम खेळ करत बाजी मारली. कर्णधार स्टर्लिंगला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.