चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे. कराचीमध्ये खेळवल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला १०७ धावांनी सहज पराभूत केलं आहे. रायन रिक्लेटनच्या उत्कृष्ट पहिल्या शतकाच्या जोरावर, दक्षिण आफ्रिकेने ३१५ धावांची मजबूत धावसंख्या उभारली होती, त्यानंतर कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी अफगाणिस्तानला केवळ २०८ धावांत गुंडाळले.
दोन्ही संघांचा अलीकडचा इतिहास लक्षात घेता हा सामना अतिशय रोमांचक आणि चुरशीचा होईल, अशी अपेक्षा होती. काही महिन्यांपूर्वीच अफगाणिस्तानने एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. त्याआधी टी-२० विश्वचषकामध्ये दोघांमध्ये अटीतटीचा सामना झाला होता, जो दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता. मात्र यावेळी आफ्रिकेने एकतर्फी सामना जिंकला.
अफगाणिस्तानने चांगली सुरुवात करून दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर टोनी डी जॉर्जीला लवकर पॅव्हेलियनमध्ये धाडले. पण नंतर आलेल्या कर्णधार बावुमाने ५८ धावांची खेळी करत रिक्लेटनच्या जोडीने डावाची धुरा सांभाळली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी झाली, ज्यामध्ये प्रथम रिक्लेटन आणि नंतर बावुमा यांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली.
त्यानंतर काही वेळाने रिक्लेटननेही आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. तो १०३ धावा करून धावबाद झाला. पण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे आक्रमण सुरूच राहिले आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन (५२) यानेही झटपट अर्धशतक केले, तर एडन मारक्रमने अवघ्या ३६ चेंडूत नाबाद ५२ धावा करत संघाला ३१५ धावांचा टप्पा गाठून दिला.
? MATCH RESULT ?
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 21, 2025
?? Rabada picks up 3 wickets as South Africa bowls out Afghanistan for 208 runs ?.
A fantastic all-round performance in the first match of Group B by the Proteas ??. #WozaNawe #BePartOfIt #ChampionsTrophy #AFGvSA pic.twitter.com/qWa7BG9Y2b
आफ्रिकेने दिलेल्या ३१६ धावांच्या लक्ष्याता पाठलाग करतानाही अफगाणिस्तानने निराश केले. आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्येच अफगाणिस्तानला बॅकफूटवर ढकलले. लुंगी एनगिडीने चौथ्या षटकात रहमानउल्ला गुरबाजला पॅव्हेलियनमध्ये पाठवले तर रबाडाने १०व्या षटकात इब्राहिम झादरानला बाद केले. पुढच्या ५ षटकांत अफगाणिस्तानने कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि सेदिकुल्लाह अटल यांच्या विकेट्सही गमावल्या, तर धावसंख्या केवळ ५० धावांपर्यंतच पोहोचू शकली.
यानंतरही धावांपेक्षा जास्त अफगाणिस्तानचे विकेट पडत होते. पण रहमत शाहने दुसऱ्या बाजूने दक्षिण आफ्रिकेला एकट्याने तोंड दिले. त्याने एकहाती ९० धावा केल्या पण संपूर्ण संघ २०८ धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ३ विकेट घेतले.