१९९९ क्रिकेट वर्ल्डकपचा सामना. इंग्लंडमधलं निसर्गरम्य होव्हचं मैदान. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मुकाबला. आफ्रिकेचे ११ खेळाडू जागेजमी जातात. भारताचे सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर सलामीला उतरतात. खेळाला सुरुवात होते आणि समालोचन करणाऱ्या समालोचकांना कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक गोष्ट समजते. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए आणि अॅलन डोनाल्ड यांच्या कानात इअरपीस असल्याचं दिसतं.
ते नेमके कोणाशी बोलत आहेत ते काही वेळात स्पष्ट होतं. आफ्रिकेचे प्रशिक्षक बॉब वूल्मर हेच या दोघांना मार्गदर्शन करत असल्याचं स्पष्ट होतं. लाईव्ह मॅचदरम्यान खेळाडूंना व्हर्च्युल मार्गदर्शन करण्याचा हा फंडा धक्कादायक होता. सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांना याविषयी कळल्यावर ते पंचांना याबद्दल सांगतात. पंच सामनाधिकाऱ्यांना याची कल्पना देतात. ड्रिंक्स ब्रेकदरम्यान सामनाधिकारी तलत अली खेळपट्टीपर्यंत पोहोचतात. तत्कालीन नियमानुसार इअरपीस किंवा तांत्रिक उपकरणाच्या माध्यमातून सामन्यादरम्यान संपर्क करणे नियमबाह्य नव्हेत पण खेळभावनेला धरुन नसल्याचं ते सांगतात. तसं सूचित केल्यानंतर क्रोनिए आणि डोनाल्ड यांना इअरपीस काढून टाका असं सांगण्यात येतं. दोघेही आदेशाचं पालन करतात. या घटनेनंतर वर्षभरात मॅचफिक्सिंगचा प्रकार उघडकीस आला होता.
आणखी वाचा: World Cup Cricket: वेस्ट इंडिजच्या गतवैभवाच्या राहिल्या फक्त आठवणी…
प्रशिक्षकांनी मार्गदर्शनाचं काम सामना सुरू होईपर्यंत करायचं असतं. प्रशिक्षकांनी आखलेल्या योजनांना मूर्त स्वरुपात आणणं हे खेळाडूंचं काम. खेळताना तटस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप योग्य नाही. पण वूल्मर यांनी नव्यानेच आलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करुन घ्यायचं ठरवलं. हे खेळभावनेला विपरीत ठरेल असं त्यांना वाटलं नाही. सामन्यादरम्यान आयतं मार्गदर्शन मिळत असल्याने क्रोनिए-डोनाल्ड यांनीही इअरपीस कानात घालणं पसंत केलं. पण हे सोंग उघडकीस आलं.
या दोघांनी सराव सामन्यांदरम्यानही इअरपीस घातले होते असं नंतर समोर आलं. वूल्मर यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले होते, “खेळाडूंना तात्काळ मदत करावी एवढाच माझा हेतू होता. मी कोणाला दुखावलं असेल तर मी माफी मागतो. खेळ नाविन्यपूर्ण करायचा माझा प्रयत्न होता. खेळाडूंनी इअरपीस घालायचं ठरवलं तेव्हा मी आयसीसीकडे परवानगी मागायला हवी होती”.
आणखी वाचा: World Cup Cricket : पेटलेलं इडन गार्डन्स आणि ओक्साबोक्शी रडणारा विनोद कांबळी
भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने मात्र यासंदर्भात आक्षेप नोंदवला नाही. अन्य खेळाडूंमध्ये प्रशिक्षक अशा पद्धतीने मार्गदर्शन करतात. त्यामुळे असं घडू शकतं असं अझरुद्दीन म्हणाला होता.
सामन्यात काय झालं?
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. इअरपीस प्रकरणाने विचलित न होता भारताने २५३ धावांची मजल मारली. सौरव गांगुलीने ११ चौकार आणि एका षटकारासह ९७ धावांची खेळी केली. राहुल द्रविडने ५४ धावा करत त्याला चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिकेतर्फे लान्स क्लुसनरने ३ विकेट्स पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना जॅक कॅलिसच्या ९६ धावांच्या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ४ विकेट्स राखून विजय मिळवला. कॅलिसने ७ चौकारांसह मॅरेथॉन खेळी केली. मार्क बाऊचरने ३४ तर जॉन्टी ऱ्होड्सने ३९ धावा करत कॅलिसला चांगली साथ दिली. कॅलिसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
आणखी वाचा: Cricket World Cup: जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने श्रीलंकेत खेळायला नकार दिला होता
दुर्देवी योगायोग म्हणजे वर्षभरात हॅन्सी क्रोनिएचा मॅचफिक्सिंग प्रकरणातला सहभाग उघड झाला. किंग कमिशनच्या चौकशीनंतर क्रोनिएवर आजीवन बंदी घालण्यात आली. क्रोनिएने या निर्णयाला आव्हान दिले पण त्याची याचिका फेटाळण्यात आली. १ जून २००२ रोजी एका विमान अपघातात क्रोनिएचा मृत्यू झाला. ६८ कसोटी, १८८ वनडेत दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलेल्या आणि प्रदीर्घ काळ नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या खेळाडूचा असा शेवट सगळ्यांनाच चटका लावणारा होता.