येत्या ९ जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या टी ट्वेंटी मालिकेसाठी पाहुण्या दक्षिण आफ्रिकन संघाचे नवी दिल्लीत आगमन झाले आहे. कर्णधार टेम्बा बावुमाच्या नेतृत्त्वाखाली आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला असून त्यांनी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. मालिकेतील पहिला सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. उमरान मलिकच्या गोलंदाजीचा सामना करणे फारच कठीण जाईल, असे बावुमा म्हणाला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार माध्यमांशी चर्चा करताना म्हणाला, “उमरान मलिक हा भारतीय संघाला मिळालेले मोठे अस्त्र आहे. भारतीय संघासाठी आयपीएलचा खूप चांगला फायदा झाला आहे. कारण, त्यातून त्यांना वेगवान गोलंदाजीचे पर्याय मिळाले आहेत. दक्षिण आफ्रिकेत आम्ही वेगवान गोलंदाजांना तोंड देत मोठे झालो आहोत. पण, तरी देखील आमच्यापैकी कोणत्याही फलंदाजाला ताशी १५० किमी वेग असलेल्या चेंडूंचा सामना करण्याची इच्छा नसेल.”

हेही वाचा – IND vs SA : पाहुण्यांना सहन होईना दिल्लीतील उष्णता, फिरकीपटू तबरेझ शम्सीचे ट्विट व्हायरल

‘आमच्या संघातदेखील ताशी १५० प्रतीकिमी वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज आहे. पण, उमरान मलिक हा भारतीय संघाला सापडलेला एक विशेष खेळाडू आहे. मला आशा आहे की तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयपीएलमधील कामगिरीचे अनुकरण करेल,’ असेही टेम्बा बावुमा म्हणाला.

उमरान मलिकने आयपीएलच्या १५व्या हंगामात २२ बळी घेऊन आपली छाप पाडली होती. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय गोलंदाज ठरला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

Story img Loader