South Africa Fielding Coach on The Field For South Africa: सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे, जिथे तो तिरंगी मालिका खेळत आहे. या मालिकेत १० फेब्रुवारीला लाहोरमध्ये न्यूझीलंडविरूद्ध सामना खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ३०४ धावा केल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ धावसंख्येचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्यावेळी मैदानावर दृश्य आश्चर्यचकित करणारे होते. आफ्रिकेचे कोच मैदानात क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिकेचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक वांडिले ग्वावू न्यूझीलंडविरूद्ध सामन्यात मैदानावर क्षेत्ररक्षण करताना दिसले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी संबंधित ही पहिलीच घटना नाही. कारण, याआधी त्यांचे फलंदाजी प्रशिक्षकही मैदानावर उतरले होते.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी महत्त्वपूर्ण अशा सामन्यात खेळाडूंऐवजी आफ्रिकेचे फिल्डिंग कोच मैदानावर क्षेत्ररक्षण करण्यासाठी का उतरले, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. लाहोरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला खेळाडूंची कमतरता भासत असल्याने संघाला हा निर्णय घ्यावा लागला.

दक्षिण आफ्रिकेचे अनेक खेळाडू पाकिस्तान दौऱ्यावर संघासह आलेले नाहीत, कारण ते SA20 लीगमध्ये खेळत होते. दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ १२ खेळाडूंसह पाकिस्तानला पोहोचला, त्यापैकी ६ खेळाडू पूर्णपणे नवखे आहेत. अशा स्थितीत न्यूझीलंडच्या डावाच्या ३७व्या षटकात दक्षिण आफ्रिकेला खेळाडूंची कमतरता भासल्याने क्षेत्ररक्षण प्रशिक्षक वँडिले ग्वावू यांना मैदानात उतरावे लागले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लाहोरमध्ये खेळाडूंच्या कमतरतेमुळे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाला मैदानात उतरावे लागले होते. यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये, जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ यूएईमध्ये आयर्लंडविरुद्ध सामना खेळत होता, तेव्हा उष्णतेमुळे खेळाडूंची तब्येत बिघडल्याने फलंदाजी प्रशिक्षक जेपी ड्युमिनीला मैदानात उतरावे लागले होते.

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात न्यूझीलंड संघाने ६ विकेट्सने शानदार विजय मिळवला. आफ्रिकेच्या संघाकडून पदार्पणवीर मॅथ्यू ब्रिट्झके याने विक्रमी १५० धावांची खेळी करत विश्वविक्रम केला. तर न्यूझीलंडकडून केन विल्यमसनने नाबाद १३३ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. याचबरोबर सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे याने ९७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.