भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान ९ जूनपासून पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी पाहुण्या दक्षिण आफ्रिकन संघाचे गुरुवारी (२ जून) नवी दिल्लीत आगमन झाले. कर्णधार टेम्बा बावुमाच्या नेतृत्त्वाखाली आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारतात दाखल होताच अॅक्शन मोडमध्ये आला आहे. संघातील सर्व खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आयोजीत केलेल्या पर्यायी सराव सत्रात भाग घेतला. फिरकीपटूंच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाला पराभूत करण्याची योजना आफ्रिकेच्या संघाने आखल्याचे सराव सत्रात स्पष्टपणे दिसून आले.
भारतात आल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघातील खेळाडूंची करोना चाचणी झाली. संघातील सर्व खेळाडू आणि इतर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी सराव सत्रात भाग घेतला. या सराव सत्रात, तबरेझ शम्सी आणि केशव महाराज या फिरकी जोडगोळी भरपूर घाम गाळताना दिसली. तबरेझ शम्सी आणि केशव महाराज यांच्यानंतर अष्टपैलू एडन मार्करमनेही फिरकी गोलंदाजीचा कसून सराव केला. अनुभवी यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने मात्र तंबूजवळ आरामात बसून या फिरकीपटूंची गोलंदाजी पाहत होता.
याशिवाय, पाच वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन करणाऱ्या वेन पार्नेलदेखील बराच वेळ सराव गेला. संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांच्या देखरेखीखाली रासी व्हॅन डेर ड्युसेनने फलंदाजी सराव केला. दक्षिण आफ्रिकेचा आयपीएल स्टार डेव्हिड मिलर सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. लवकरच तो दक्षिण आफ्रिकन संघात सामील होण्याची शक्यता आहे.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या अष्टपैलू ड्वेन प्रिटोरियससह तबरेझ शम्सी, केशव महाराज आणि एडन मार्करम हे त्रिकूट भारताविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे आहे. अशा स्थितीत केएल राहुल आणि कंपनीला दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंपासून सावध राहावे लागेल.
दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना ९ जून २०२२ रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.