माऊंट मॉन्गानुई : वेगवान गोलंदाज काएल जेमिसन (४/५८) आणि डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनर (३/५९) यांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने नवोदित खेळाडूंचा भरणा असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात २८१ धावांनी पराभूत केले. या विजयासह न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.

माऊंट मॉन्गानुई येथे झालेल्या या सामन्यात कर्णधार टीम साऊदीने तिसऱ्या दिवशीच्या ४ बाद १७९ धावांवरच न्यूझीलंडचा दुसरा डाव घोषित केला आणि दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ५२९ धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले. याचा पाठलाग करताना जेमिसनने आणि सँटनरच्या माऱ्यापुढे आफ्रिकेच्या अननुभवी फलंदाजांचा निभाव लागला नाही. आफ्रिकेचा दुसरा डाव २४७ धावांवर संपुष्टात आला आणि न्यूझीलंडने विजय मिळवला.

हेही वाचा >>>Varun Kumar : हॉकीपटू वरुण कुमारवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

त्यापूर्वी न्यूझीलंडने पहिल्या डावात ५११ धावा केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला १६२ धावांत गुंडाळले होते. न्यूझीलंडकडून केन विल्यम्सनने दोनही डावांत शतके साकारली.या कसोटीच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावणाऱ्या रचिन रवींद्रला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना १३ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे.