पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर बलाढय़ ऑस्ट्रेलियाला चीतपट करत दक्षिण आफ्रिकेने कसोटी क्रमवारीतील अढळस्थानावर शिक्कामोर्तब केले. गेल्या दोन दशकांत लढवय्या ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच भूमीत सलग दोन दौऱ्यात नमवण्याचा भीमपराक्रम ग्रॅमी स्मिथच्या आफ्रिकन संघाने नावावर केला. सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय साकारत दक्षिण आफ्रिकेने २००वी कसोटी संस्मरणीय केली. मात्र अखेरच्या कसोटीत रिकी पॉन्टिंगला चांगली कामगिरी करता आली नाही. आठ धावांवर बाद होत पॉन्टिंगने कसोटी क्रिकेटला अलविदा केला.
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत अॅडलेड आणि ब्रिस्बेन कसोटी अनिर्णीत सुटल्याने दक्षिण आफ्रिकेला अव्वलस्थान राखण्यासाठी पर्थ कसोटीत विजय मिळवणे किंवा कसोटी अनिर्णीत राखणे आवश्यक होते. मात्र विजयासाठी ६३२ धावांचे प्रचंड लक्ष्य दिलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला ३२२ धावांत गुंडाळत आफ्रिकेने मालिकेत १-० अशा दिमाखदार विजयाची नोंद केली.
चौथ्या दिवशी बिनबाद ४० धावांवरून पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला आफ्रिकन गोलंदाजांनी ठरावीक अंतराने माघारी धाडले. शेवटची कसोटी खेळणारा रिकी पॉन्टिंग (८) आणि जबरदस्त फॉर्मात असलेला मायकेल क्लार्क (४४) तसेच भरवशाचा माइक हसी (२६) झटपट बाद झाल्याने चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाचा पराभव अटळ होता. मात्र दहाव्या विकेटसाठी नॅथन लिऑन आणि मिचेल स्टार्कने ८७ धावा जोडत पराभव लांबवला. डेल स्टेनने लिऑनला बाद करत ऑस्ट्रेलियाचा प्रतिकार संपुष्टात आणला. डेल स्टेन आणि रॉबिन पीटरसन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. हशीम अमलाला सामनावीर तर मायकेल क्लार्कला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. २००६नंतर दक्षिण आफ्रिकेने परदेशी दौऱ्यात एकही मालिका गमावलेली नाही. वाकाच्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेने गेल्या तीन सामन्यांत दोन विजय आणि एक सामना अनिर्णीत राखला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा