U19 World Cup Semi Final 2024 IND vs SA Match updates :

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवघड खेळपट्टी, दर्जेदार गोलंदाजी यांचा समर्थपणे सामना करत बीडच्या सचिन धसने U19 वर्ल्डकप स्पर्धेत, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये ९६ धावांची जिगरबाज खेळी केली आणि भारताने दिमाखात अंतिम फेरी गाठली. २४५च्या लक्ष्यासमोर भारताची अवस्था ३२/४ अशी झाली होती. पण सचिनने आत्मविश्वासाने खेळ करताना तडाखेबंद खेळी साकारली. कर्णधार उदय सहारनने सचिनला तोलामोलाची साथ दिली. मोक्याच्या क्षणी सचिन बाद झाला पण त्यानंतर कर्णधार उदयने ८१ धावांची संयमी खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अंतिम लढतीत भारतासमोर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील विजेत्या संघाचं आव्हान समोर असेल. या स्पर्धेची पाच जेतेपदं नावावर असणारा भारतीय संघ जेतेपद आपल्याकडेच राखण्यासाठी आतूर आहे. भारताने नवव्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

भारतीय संघाने प्राथमिक फेरीच्या लढती ब्लोमफाऊंटनच्या मैदानावर खेळल्या होत्या. सेमी फायनलची लढत बेनोईच्या मैदानावर झाली. असमान उसळी हे या खेळपट्टीचं वैशिष्टय होतं. क्वेना मफाखाने पहिल्याच षटकात आदर्श सिंगला बाद केलं. त्याला भोपळाही फोडता आला नाही. स्पर्धेत सर्वाधिक धावा नावावर असणाऱ्या मुशीर खानला त्रिस्टन ल्यूसने बाद केलं. मुशीर फक्त ४ धावा करु शकला. मफाका आणि अर्शिन कुलकर्णी यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली. ऑफस्टंपपासून दूर चेंडू खेळायचा अर्शिनचा प्रयत्न स्लिपमध्ये जेम्सच्या हातात जाऊन विसावला. अर्शिनने १२ धावा केल्या. अर्शिनपाठोपाठ प्रियांशू मोलियाला ल्यूसने बाद केलं. चांगल्या दर्जाचं गोलंदाजी आक्रमण आणि आव्हानात्मक खेळपट्टी हे समीकरम समजून घेत सचिन-उदय जोडीने भागीदारी रचली. त्यांनी सुरुवातीला एकेरी, दुहेरी धावांवर भर दिला. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर सचिनने पूल आणि हूकच्या फटक्यांद्वारे चौकार वसूल केले. सचिन-उदय जोडीने पाचव्या विकेटसाठी १८७ चेंडूत १७१ धावांची भागीदारी रचत विजयाचा पाया रचला.

शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या सचिनला मफाकाच्या चेंडूने फसवले. त्याने ९५ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकारासह ९६ धावांची अफलातून खेळी केली. सचिन बाद झाल्यानंतर कर्णधार उदयने सामन्याची सूत्रं हाती घेतली. अरावेली अविनाशने १० धावा केल्या पण मफाकाने उसळत्या चेंडूवर त्याला बाद केलं. मरेइसच्या अचूक धावफेकीमुळे मुरुगन अभिषेक भोपळाही न फोडता तंबूत परतला. राज लिंबानीने उदयला चांगली साथ दिली. एक धाव हवी असताना चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात कर्णधार उदय बाद झाला. त्याने ८१ धावांची संस्मरणीय खेळी केली. लिंबानीने नाबाद १३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेने लुआन-ड्रे प्रिटोरियस आणि रिचर्ड सेलेट्सवेन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ गडी गमावून २४४ धावा केल्या.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. दक्षिण आफ्रिकेने ४६ धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. यानंतर लुआन-ड्रे प्रिटोरियसने रिचर्ड सेलेट्सवेनच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. प्रिटोरियसने १०२ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ७६ धावांची खेळी केली. त्यानंतर ऑलिव्हर व्हाईटहेडने २२ धावा, डेव्हन मरायसने तीन आणि कर्णधार युआन जेम्सने २४ धावा केल्या.

राज लिंबानीने घेतल्या सर्वाधिक तीन विकेट्स –

रिचर्डने एक बाजू सांभाळताना अर्धशतक झळकावले. तो १०० चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६४ धावा करून बाद झाला. रिले नॉर्टन सात धावा करून नाबाद राहिला आणि ट्रिस्टन लुस १२ चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २३ धावा करून नाबाद राहिला. भारताकडून राज लिंबानी याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तसेच मुशीर खानने दोन विकेट घेतल्या. नमन तिवारी आणि सौमी पांडे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – SAT20 : धक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवत स्टार क्रिकेटपटूला लुटले, दक्षिण आफ्रिकेतील घटना

भारतीय संघ आतापर्यंत अजिंक्य –

एकोणीस वर्षाखालील विश्वचषक २०२४ स्पर्धेत भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. ग्रुप स्टेजपासून सुपर सिक्स पर्यंत कोणत्याही संघाला या स्पर्धेत भारताला हरवता आलेले नाही. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत ५ सामने जिंकले आहेत. सुपर सिक्सच्या महत्त्वाच्या सामन्यात संघाने न्यूझीलंडचा २१४ धावांनी तर नेपाळचा १३२ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. अशा स्थितीत भारतीय संघ पूर्ण उत्साहात आहे. भारताची ही कामगिरी पाहता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमकदार कामगिरी करून अंतिम फेरीतही प्रवेश करेल, अशी अपेक्षा आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

दक्षिण आफ्रिका: युआन जेम्स (कर्णधार), क्वेना माफाका, दिवान माराईस, नकोबानी मोकोएना, रिले नॉर्टन, लुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), रिचर्ड सेलेट्सवेन, स्टीव्ह स्टोक्स, डेव्हिड टेगर, ऑलिव्हर व्हाइटहेड, ट्रिस्टन लुस.

भारत: उदय सहारन (कर्णधार), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, सचिन दास, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश, सौम्य कुमार पांडे, मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South africa set a target of 245 runs against team india in u19 world cup semi final 2024 vbm