आयसीसी चॅम्पियन्स करंडक
आयसीसी चॅम्पियन्स करंडक मालिकेच्या पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात आफ्रिकेने पाकिस्तान संघावर ६७ धावांनी विजय मिळवला. एकापाठोपाठ दिग्गज फलंदाज माघारी परतत असताना दक्षिण आफ्रिकेची ‘भिंत’ म्हणून ओळखला जाणारा हशिम अमला मैदानावर ठाण मांडून उभा राहिला. सावध आणि संयमी खेळी करून अमलाने दक्षिण आफ्रिकेला चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत निर्धारित षटकांत ९ बाद २३४ धावांपर्यंतच मजल मारून दिली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला अमलाच्या शैलीदार ८१ धावांच्या खेळीचा फायदा उठवता आला नाही. आफ्रिकेच्या मधल्या फळीतील फलंदाजांना अपेक्षेइतका आक्रमक खेळ करता आला नाही. शेवटच्या दहा षटकांमध्ये त्यांना फक्त ५१ धावा करता आल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना जखडून ठेवले.
कॉलिन इनग्राम व अमला यांनी सलामीसाठी ५३ धावांची भागीदारी रचत आश्वासक सुरुवात केली. इंग्रामने दोन चौकारांसह २० धावा केल्या. त्याच्या जागी आलेल्या फॅफ डू प्लेसिसच्या साथीत अमलाने ६९ धावांची भर टाकली. प्लेसिसने दोन चौकारांसह २८ धावा केल्या. अमला बाद झाल्यानंतर एबी. डी’व्हिलीयर्स (३१ चेंडूंत ३१ धावा) व जे.पी. डय़ुमिनी (२४) यांनी संघाच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र धावांचा वेग वाढविण्यात त्यांना यश आले नाही. रायन मॅकलारेन (४), ख्रिस मॉरिस (१) यांनी निराशा केली. पाकिस्तानकडून मोहम्मद इरफान, जुनैद खान, मोहम्मद हाफीझ, सईद अजमल व शोएब मलिक यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.