चेन्नई इथे झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेतील अटीतटीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर एका विकेटने निसटता विजय मिळवला. पाकिस्तानने सातत्याने विकेट्स पटकावत आफ्रिकेला अडचणीत आणलं पण दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने संयमी खेळ करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे तर दुसरीकडे पाकिस्तानसाठी हा चौथा पराभव असल्याने त्यांच्यासाठी बाद फेरीचा रस्ता खडतर झाला आहे. विजयासाठी मिळालेल्या २७१ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मारक्रमने ९१ धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला पण दुसऱ्या बाजूने सातत्याने विकेट्स गेल्याने पाकिस्तानच्या आशा पल्लवित झाल्या.
पाकिस्तानने हैदराबाद इथे झालेल्या दोन लढतींमध्ये विजय मिळवत चांगली सुरुवात केली होती. पहिल्या लढतीत नेदरलँड्स तर दुसऱ्या लढतीत श्रीलंकेवर मात केली होती. पण पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पाते पराभूत झाले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धही पराभवच पदरी पडल्याने पाकिस्तानसाठी बाद फेरीचं समीकरण कठीण झालं आहे.
आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात डळमळीत झाली. वर्ल्डकप स्पर्धेत तीन शतकं झळकावणाऱ्या क्विंटन डी कॉकला शाहीन शहा आफ्रिदीने बाद केलं. त्याने २४ धावा केल्या. यानंतर तेंबा बावूमा-रासी व्हॅन डर डुसे यांची जोडी जमली. मोहम्मद वासिमच्या गोलंदाजीवर बावूमाने मारलेला फटका सौद शकीलच्या हातात जाऊन विसावला. शदाब खान दुखापतग्रस्त झाल्यामुळे काँकशन सबस्टिट्यूट म्हणून उसामा मीरचा समावेश करण्यात आला. उसामाच्या गोलंदाजीवर अंपायरने आऊटचा निर्णय दिला. सुरुवातीला विकेट्स मिसिंग दाखवण्यात आलं. काही सेकंदात अंपायर्स कॉल झालं. त्यामुळे पॉल रायफेलचा निर्णय कायम राहिला. डुसेने २१ धावा केल्या. तडाखेबंद फॉर्मात असलेल्या हेनरिच क्लासनने षटकारासह सुरुवात केली पण मोहम्मद वासिमच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न उसामा मीरच्या हातात गेला. यानंतर एडन मारक्रम आणि डेव्हिड मिलर जोडीने पाचव्या विकेटसाठी ६९ चेंडूत ७० धावांची भागीदारी केली. शाहीन शहा आफ्रिदीने मिलरला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर मारक्रमला मार्को यान्सनची साथ मिळाली. हारिस रौफने यान्सनला बाद केलं. त्याने २० धावा केल्या. विजय दृष्टिक्षेपात असताना एडन मारक्रम बाद झाला. अनुनभवी उसामा मीरने मारक्रमला बाद केलं. मारक्रमने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ९१ धावांची खेळी केली. मारक्रम बाद होताच दक्षिण आफ्रिकेच्या विजयाच्या आशा मावळल्या.
शाहीन शहा आफ्रिदीने गेराल्ड कोटइझेला बाद करत आफ्रिकेला अडचणीत आलं. यानंतर एकेक धावासाठी दक्षिण आफ्रिकेला संघर्ष करावा लागला. हारिस रौफने स्वत:च्याच गोलंदाजीवर लुंगी एन्गिडीला बाद करत ही जोडी फोडली. महाराजने २१ चेंडूत ७ धावा करत संघाला विजय मिळवू दिला.
तत्पूर्वी पाकिस्तानने २७० धावांची मजल मारली. कर्णधार बाबर आझम, सौद शकील यांच्या अर्धशतकी खेळींच्या बळावर पाकिस्तानने २७० धावांची मजल मारली. अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक या सामन्यातही मोठी खेळी करु शकले नाहीत. यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची जोडी जमली. रिझवान स्थिरावलाय असं वाटत असतानाच गेराल्ड कोइटझेच्या उसळत्या चेंडूवर बाद झाला. रिझवानने ३१ धावा केल्या.
इफ्तिकारने बाबरला साथ दिली. तबरेझ शम्सीने इफ्तिकारला बाद करत ही जोडी फोडली. संथ आणि कूर्मगती अर्धशतकानंतर बाबर बाद झाला. त्याने ६५ चेंडूत ५० धावांची खेळी केली. सौद शकील आणि शदाब खान जोडीने सहाव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. कोइटझेने शदाबला केशव महाराजकडे झेल देण्यास भाग पाडलं. शदाबने ३६ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. सौद शकील अर्धशतकानंतर फटकेबाजी करणार असं वाटत असतानाच शम्सीने त्याला माघारी धाडलं. सौदने ५२ धावांची खेळी केली. मोहम्मद नवाझने २४ धावा करत धावफलक हलता ठेवला. दक्षिण आफ्रिकेचा संघ तीनशे धावांचा टप्पा ओलांडणार असं चित्र होतं पण दक्षिण आफ्रिकेने वेसण घातली. पाकिस्तानचा डाव ४६.४ षटकात २७० धावात आटोपला. दक्षिण आफ्रिकेतर्फे शम्सीने ४ तर मार्को यान्सनने ३ विकेट्स घेतल्या.