क्रिकेटच्या दुनियेतील एक महान अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या जॅक्स कॅलिसने बुधवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर तो कसोटी क्रिकेटला अलविदा करणार आहे, परंतु एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र तो खेळतच राहणार आहे.
डिसेंबर १९९५मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या ३८ वर्षीय कॅलिस यंदाच्या हंगामात निवृत्ती पत्करणारा तिसरा मोठा क्रिकेटपटू आहे. ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आणि भारताच्या सचिन तेंडुलकरनेही याच वर्षी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला.
‘‘१८ वर्षांपूर्वी पदार्पण केल्यापासून दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा सदस्य राहिलो, हा मी माझा सन्मान समजतो. मैदानवरील प्रत्येक क्षणाचा मी आनंद लुटला. परंतु कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याची ही योग्य वेळ आहे, अशी माझी भावना झाली,’’ असे कॅलिस आपल्या निवृत्तीच्या निर्णयाविषयी सांगितले.
कसोटी क्रिकेटमधील अव्वल दहा शतकवीरांच्या यादीतील आता फक्त कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने हे दोन श्रीलंकेचे खेळाडूच देशाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या दोघांची वये ३६ वष्रे आहेत.

हा निर्णय मुळीच सोपा नव्हता. कारण अ‍ॅशेसवर वर्चस्व गाजवणारा ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेत येत आहे. परंतु निवृत्तीचा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ होती, असे मला वाटते. माझा क्रिकेटला अलविदा असे समजण्याची आवश्यकता नाही. कारण जर मी तंदुरुस्त राहिलो आणि माझी कामगिरी चांगली होत राहिली तर २०१५चा विश्वचषक दक्षिण आफ्रिकेला जिंकून देण्यासाठी मी उत्सुक आहे!
-जॅक कॅलिस

सर्वाधिक शतके झळकावणाऱ्यांच्या पंक्तीत दुसरा
कॅलिसने १८ वष्रे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आणि त्याच्या खात्यावर १३१७४ धावा आणि ४४ शतके जमा होती. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्यांच्या यादीत सचिन तेंडुलकर (५१)नंतर तो दुसऱ्या स्थानावर होता. यानंतर पाँटिंग (४१), द्रविड (३६), सुनील गावस्कर (३४), ब्रायन लारा (३४), कुमार संगकारा (३३), स्टीव्ह वॉ (३२), महेला जयवर्धने (३१), मॅथ्यू हेडन (३०) यांचा क्रमांक लागतो.

अष्टपैलू खेळाडूंच्या पंक्तीत तिसरा
कामगिरीचा विचार केल्यास सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंच्या पंक्तीत कॅलिसचा तिसरा क्रमांक लागतो. सर गॅरी सोबर्स यांनी ९३ कसोटी सामन्यांत ८०३२ धावा, २३५ बळी आणि १०९ झेल मिळवण्याची किमया साधली, तर सर इयान बोथम यांच्या नावावर १०२ कसोटी सामन्यांत ५२०० धावा, ३८३ बळी आणि १२० झेल जमा आहेत.

कसोटी कारकीर्द
सामने    डाव    धावा    शतके    सरासरी  बळी     झेल
१६५    २७१   १३१७४    ४४    ५५.१२      २९२    १९९

सर्वाधिक कसोटी धावा काढणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथा
सचिन तेंडुलकर    २००    १५,९२१
रिकी पाँटिंग        १६८    १३,३७८
राहुल द्रविड        १६४    १३,२८८
जॅक कॅलिस        १६५    १३,१७४

Story img Loader