दक्षिण आफ्रिकेचा माजी विस्फोटक फलंदाज अब्राहम डिव्हिलियर्सने यंदाचा टी-20 क्रिकेट वर्ल्डकप खेळण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी संघाचा मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचरशी चर्चा करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. डिव्हिलियर्सने मे 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आयपीएल 2021मध्ये तो उत्तम फॉर्मात आहे. रविवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्याने 34 चेंडूत 76 धावांची नाबाद खेळी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला शानदार विजय मिळवून दिला.
डिव्हिलियर्सने सामन्यानंतर सांगितले, “आम्हाला आयपीएल दरम्यान काही काळ बोलण्याची संधी आहे. पण हो, आम्ही आधीच त्याबद्दल बोलत आहोत. गेल्या वर्षी त्याने मला पुनरागमनाविषयी विचारले होते आणि मी हो म्हणून सांगितले. आयपीएलनंतर माझा फॉर्म आणि फिटनेस कोठे आहे ते आपण पाहू.”
डिव्हिलियर्स म्हणाला, “संघातील तरुण खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. जर मला जागा मिळाली नाही, तर ठीक आहे. जर मी तिथे जाऊ शकलो, तर ते शानदार असेल. आयपीएलच्या अखेरीस मी बाऊचरशी बोलणी करेन आणि त्यानुसार योजना बनवू.”
क्रिकेट कारकीर्द
एबी डिव्हिलियर्सने 2005मध्ये एकदिवसीय पदार्पण केले. त्याने 228 एकदिवसीय सामन्यात 9577 धावा केल्या आहेत. तर 114 कसोटी सामन्यात त्याच्या खात्यात 8765 धावांची नोंद आहे. 2006पासून तो आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट खेळतो आहे. 78 टी-20 सामन्यात त्याने 1672 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 25, कसोटीत 22 शतके ठोकली आहेत.