दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर जेपी ड्युमिनीची पत्नी आणि आजीवर काही चोरट्यांनी हल्ला केला. ड्युमिनेनच स्वत: ट्विटरवरुन या घटनेसंदर्भात माहिती दिली असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन ड्युमिनीने केलयं. त्याने ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी त्याची पत्नी आणि आजी केपटाऊनमधील एका मेडिकलमध्ये औषधे घेताना एका चोरट्याने या दोघींवर हल्ला केला. यात त्याची पत्नी सू च्या गळ्यातील नेकलस चोरट्याने ओढून नेला. चोरट्याने केलेल्या हल्ल्यात ड्युमिनीच्या आजीच्या हाताला फॅक्चर झाले आहे.

आपली आजी आणि पत्नी यांच्यावर ओढवलेला प्रसंग अन्य कोणाच्या वाट्याला येऊ नये, या भावनेतून ड्युमिनीने या घटनेची माहिती दिली. केपटाऊनच्या या परिसरात वावरताना खबरदारी घ्या, असे आवाहन त्याने नागरिकांना केले आहे. जेपी ड्युमिनीपेक्षाही त्याची पत्नी सू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. अनेकदा ती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या चिमुकलीसोबतचे काही व्हिडिओ शेअर केले होते. त्याला नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले होते.

जपी ड्युमिनीविषयी सांगायचे तर बांगलादेशविरुद्ध झालेल्या एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात मैदानात उतरलेल्या ड्युमिनीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून ४६ कसोटी सामन्यात २१०३ धावा केल्या असून ४२ विकेट्स घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू आयपीएल स्पर्धेत चेन्नईनंतर हैदराबादच्या संघातून खेळताना दिसला होता. यात ७७ सामन्यात त्याने ७९८ धावा केल्या आहेत. तर २३ बळी देखील टिपले आहेत.