भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान पाच सामन्यांची टी ट्वेंटी खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना आज अरुण जेटली स्टेडियमवर सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या मालिकेवर आता करोनाची वक्रदृष्टी पडली आहे. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एडन मार्करामला करोनाची लागण झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेकीदरम्यान मार्करमची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. करोनाची लागण झाल्याने मालिकेमध्ये मार्करमच्या खेळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याच्या जागी ट्रिस्टन स्टब्स पदार्पणाचा सामना खेळणार आहे.
हेही वाचा – …जेव्हा विराट कोहलीने आपल्या कृतीतून जिंकली होती क्रिकेट चाहत्यांची मने
पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळण्यासाठी आफ्रिकेचा संघ २ जून रोजी भारतात दाखल झाला होता. बीसीसीआयने बायोबबलची सक्ती केलेली नसल्यामुळे सर्व खेळाडूंनी फक्त आरटीपीसीआर चाचणी करून घेतली होती. त्यावेळी सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. मात्र, आता एडन मार्करमची चाचणी करोना पॉझिटिव्ह आल्याने दोन्ही संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.