भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान ९ जूनपासून पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. दिल्लीतील तापमानाचा विचार केल्यास, तेथील वातावरणामध्ये प्रचंड उष्णता आहे. अगदी रात्रीचे तापमान देखील ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असते. याचा अर्थ पाहुण्या खेळाडूंना राजधानीतील उष्णतेशी जुळवून घेताना कसरत करावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेझ शम्सीने एक मिश्किल ट्विट करून दिल्लीतील हवामानाचे अपडेट्स दिले आहेत.

हेही वाचा – Ranji Trophy 2022 Quarterfinals : ‘या’ रणजी खेळाडूचे ऐतिहासिक शतक, सर ब्रॅडमन यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

आगामी टी ट्वेंटी मालिकेसाठी पाहुण्या दक्षिण आफ्रिकन संघाचे नवी दिल्लीत आगमन झाले आहे. कर्णधार टेम्बा बावुमाच्या नेतृत्त्वाखाली आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झाला असून त्यांनी जोरदार सरावालाही सुरुवात केली आहे. या सराव सत्रात, तबरेझ शम्सी आणि केशव महाराज या फिरकी जोडगोळी भरपूर घाम गाळताना दिसली. तबरेझ शम्सीला दिल्लीच्या हवेतील उष्णता त्रासदायक वाटू लागली आहे. याबद्दल त्याने एक ट्विट केले आहे. “बाहेर फक्त ४२ अंश तापमान आहे.. अजिबात उष्णता नाही,” असे उपहासात्मक ट्विट त्याने केले आहे.

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू उष्णतेमुळे त्रस्त असताना भारतीय खेळाडूंनी मात्र आरामात आपले सराव सत्र पार पाडले आहे. भारतीय वेगवान गोलंदाज अवेश खान आणि अर्शदीप सिंग यांनी कसून सराव केला. आवेशने इशान किशन, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना गोलंदाजी करून यॉर्कर गोलंदाजीचा सराव केला. तर, अर्शदीप सिंग गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करताना दिसला.

सराव सत्रात सर्वांच्या नजरा जम्मू एक्स्प्रेस उमरान मलिकवर होत्या. त्याने सराव सत्रात श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि दीपक हुडा यांच्यासाठी गोलंदाजी केली.

Story img Loader