फुटबॉलचा महासंग्राम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे जून महिन्यात ब्राझीलमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. फुटबॉलपटूंना क्लबकडून मिळणाऱ्या मानधनाचे आकडे पाहून सर्वाचेच डोळे दिपतात. या वर्षीच्या फिफा विश्वचषक स्पर्धेत स्पेन हा संघ सर्वात महागडा संघ ठरणार आहे. स्पेनपाठोपाठ अर्जेटिना आणि ब्राझीलने स्थान पटकावले आहे. अर्जेटिना आणि बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी फिफा विश्वचषकातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याखालोखाल पोर्तुगाल आणि रिअल माद्रिदच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने स्थान पटकावले आहे.
खेळाडूंना क्लबकडून मिळणारे मानधन, वय, तांत्रिक क्षमता, तंदुरुस्ती अशा ७७ निकषांच्या आधारावर फिफा विश्वचषकात सहभागी होणाऱ्या ३२ संघांचे मूल्य ठरवण्यात आले आहे. गतविजेत्या स्पेनचा संघ ४८६.९ दशलक्ष युरो किमतीचा आहे. अर्जेटिनाचा संघ ४७४.१ तर ब्राझीलचा संघ ४७०.२ दशलक्ष युरो किमतीचा आहे. जर्मनीच्या संघाची किंमत ४४५.६ दशलक्ष युरो इतकी असून फ्रान्सची ३९८.६ तर इंग्लंडची ३५४.२ दशलक्ष युरो इतकी आहे. बेल्जियमचा संघ ३३६.१ तर इटलीचा संघ ३२२.४ दशलक्ष युरो किमतीचा आहे.
अर्जेटिनाच्या मेस्सीची किंमत १३८.१ दशलक्ष युरो इतकी असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याच्या किमतीत १.४ टक्केघसरण झाली आहे. रोनाल्डोची किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत ११.४ टक्क्यांनी वाढली असली तरी मेस्सीपेक्षा तो ३० दशलक्ष युरो किमतीने पिछाडीवर आहे. १०७.३ दशलक्ष युरो मिळवणाऱ्या रोनाल्डोच्या संपूर्ण पोर्तुगाल संघाची किंमत २८७ दशलक्ष युरो इतकी आहे. होंडुरास संघाची किंमत ३२.३ दशलक्ष युरो इतकी आहे. मेस्सीच्या किमतीपेक्षा ती एक चतुर्थाशपेक्षाही कमी आहे. ७ मे रोजी अंतिम संघ जाहीर झाल्यानंतर अचूक किंमत जाहीर करण्यात येईल.

बार्सिलोनाविरुद्धच्या सामन्याला रोनाल्डो मुकण्याची शक्यता
कोपा डेल रे चषकातील बार्सिलोनाविरुद्ध बुधवारी होणाऱ्या अंतिम सामन्याला रिअल माद्रिदचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो मुकण्याची शक्यता आहे. रोनाल्डो अद्याप पायाच्या दुखापतीतून सावरलेला नाही. रोनाल्डो वेळेआधीच तंदुरुस्त होईल, अशी आशा माद्रिदचे प्रशिक्षक कालरे अँकलोट्टी यांना वाटत असला तरी मंगळवारी सराव शिबिराला अनुपस्थित राहिल्यामुळे रोनाल्डोच्या पुनरागमनाच्या आशा धुसर झाल्या आहेत. २३ एप्रिलला बायर्न म्युनिकविरुद्ध होणाऱ्या चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रोनाल्डो पुनरागमन करणार आहे.