चेंडूवर सर्वाधिक ताबा मिळवून पासिंगचा सुरेख मिलाफ साधणारा स्पेन.. समोर प्रतिहल्ले करणारा इटली संघ.. निर्धारित वेळेत गोलशून्यची बरोबरी.. सामन्याची उत्सुकता शिगेला.. अतिरिक्त वेळेतही गोल करण्यात दोन्ही संघांना अपयश.. सामन्याचा निकाल पेनल्टी-शूटआऊटवर अवलंबून.. हृदयाचे ठोके चुकविणारे क्षण.. पहिल्या सहा प्रयत्नांमध्ये ६-६ अशी बरोबरी.. लिओनाडरे बोनुक्कीच्या हुकलेल्या पेनल्टीमुळे इटलीच्या गोटात चिंतेचे वातावरण.. सर्वाच्या नजरा जीजस नवसच्या कामगिरीकडे.. नवसने चेंडू डाव्या बाजूला टोलवून गोलजाळ्यात धाडल्यानंतर स्पेनच्या आनंदाला उधाण आले. स्पेनने पेनल्टी-शूटआऊटमध्ये इटलीवर ७-६ असा विजय मिळवून कॉन्फेडरेशन चषकाची अंतिम फेरी गाठली.
गेल्या पाच वर्षांत स्पेनने सलग चौथ्यांदा (२००८ आणि २०१२मधील युरोपियन चषक स्पर्धा तसेच २०१० विश्वचषक स्पर्धा) प्रतिष्ठेच्या स्पर्धाच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची किमया केली. युरो चषकाच्या अंतिम फेरीत इटलीवर ४-० असा सहज विजय मिळवणाऱ्या स्पेनसाठी गुरुवारी रात्री मिळवलेला विजय हा स्वप्नवत ठरला. आता कॉन्फेडरेशन चषक उंचावण्यासाठी स्पेनला रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात यजमान ब्राझीलशी झुंज द्यावी लागणार आहे.
अंतिम फेरीत स्पेनशी सामना नको म्हणून ब्राझीलच्या चाहत्यांचा इटलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत होता. इटलीने तीन बचावपटू, सहा मध्यरक्षक आणि एक आघाडीवीर अशी रणनीती स्पेनसाठी आखली होती. त्यामुळे स्पेनच्या आघाडीवीरांना इटलीची बचावफळी भेदता येत नव्हती. ३६व्या मिनिटाला इटलीच्या ख्रिस्तियन मॅगियो याला गोल करण्याची सुरेख संधी होती. मात्र गोलक्षेत्रातूून मॅगियोने हेडरवर मारलेला फटका स्पेनचा गोलरक्षक आयकर कसिल्लासने अडवला. त्यानंतर लगेचच झावी हेर्नाडेझने सुरेख चाल रचली. पण फर्नाडो टोरेसने मारलेला फटका गोलजाळ्याच्या बराच बाजूने गेला. ९२व्या मिनिटाला नवसने इटलीचा गोलरक्षक गियानलुईगी बफन याला चकवण्याचा प्रयत्न केला. पण स्वत:ला सावरत बफनने त्याचा हा फटका अचूक अडवला.
निर्धारित वेळेनंतर अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघाला गोल करता आला नाही. त्यानंतर दोन्ही संघांनी पहिल्या प्रयत्नांत गोल करण्याची संधी वाया घालवली नाही. प्रत्येक गोलनंतर सामन्यातील चुरस वाढतच होती. इटलीकडून अँटोनियो कांड्रेव्हा, अल्बटरे अक्विलानी, डॅनियल डे रोस्सी, सेबॅस्टियन जियोविन्को, आंद्रिया पिलरे, रिकाडरे मोन्टोलिव्हो यांनी पहिले सहा गोल केले. स्पेनकडून झावी हेर्नाडेझ, आंद्रेस इनियेस्टा, गेरार्ड पिक, सर्जी रामोस, जुआन माटा, सर्जीओ बस्केट्स यांनी गोल झळकावले. सातव्या प्रयत्नांत इटलीच्या बोनुक्कीने मारलेला फटका गोलजाळ्याच्या वरून गेल्यामुळे स्पेनला विजयाची संधी चालून आली. नवसने कोणतीही चूक न करता गोल लगावला आणि स्पेनला अंतिम फेरीचे तिकीट मिळवून दिले. ‘‘हा सामना आमच्यासाठी फारच खडतर होता. अंतिम सामन्यात कामगिरी सुधारण्यासाठी आम्हाला पुढील तीन दिवसांत योग्य ती रणनीती आखावी लागणार आहे,’’ असे स्पेनचे प्रशिक्षक विन्सेंट डेल बॉस्के यांनी सांगितले.

Story img Loader