विश्वविजेत्या स्पेनने साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात नायजेरियाचा ३-० असा सहज पाडाव करत ‘ब’ गटात अव्वल स्थान पटकावून कॉन्फेडरेशन चषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. २०१०चा विश्वविजेता स्पेन आणि २००६चा विश्वविजेता इटली यांच्यात २७ जूनला मध्यरात्री कॉन्फेडरेशन चषकाची उपांत्य लढत रंगणार आहे.
अंतिम चार जणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी विन्सेंट डेल बॉस्के यांच्या प्रशिक्षकपदाखालील स्पेनला अवघ्या एका गुणाची आवश्यकता होती. मात्र जॉर्डी अल्बाचे (तिसऱ्या, ८८व्या मिनिटाला) दोन गोल आणि ६२व्या मिनिटाला फर्नाडो टोरेसने हेडरद्वारे केलेल्या गोलमुळे स्पेनने नायजेरियाचे आव्हान सहज परतवून लावत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. ताहितीविरुद्ध चार गोल झळकावणारा टोरेस पाच गोल्सनिशी सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत आघाडीवर आहे.
उरुग्वेकडून ताहितीचा ८-०ने धुव्वा
 उरुग्वेने दुबळ्या ताहितीचा ८-० असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान गोलची नोंद करत उरुग्वेने ताहितीवर दणदणीत विजय मिळवला. ७९व्या सेकंदाला अबेल हेर्नाडेझने उरुग्वेचे खाते खोलल्यानंतर त्याने एकूण चार गोल लगावले. लुइस सुआरेझने दोन आणि दिएगो पेरेझ व निकोलस लोडेरो यांच्या प्रत्येकी एक गोलाच्या बळावर उरुग्वेने थाटात विजय साजरा केला. आत बुधवारी मध्यरात्री उरुग्वेचा उपांत्य फेरीचा सामना पाच वेळा विश्वचषक विजेच्या आणि यजमान ब्राझीलशी होईल.
उपांत्य फेरीच्या लढती
ब्राझील वि. उरुग्वे (२६ जून मध्यरात्री)
स्पेन वि. इटली (२७ जून मध्यरात्री)