एपी, विम्बल्डन (लंडन)
प्रतिष्ठेच्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत स्पेनच्या कार्लोस अल्कराझला अग्रमानांकन लाभले आहे. या स्पर्धेत २००३ पासून प्रथमच नोव्हाक जोकोविच, रॉजर फेडरर, अँडी मरे आणि राफेल नदाल यांच्याऐवजी एखाद्या खेळाडूला अग्रमानांकन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे जोकोव्हिच या स्पर्धेचा गतविजेता आहे.
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यापासून जोकोव्हिच एकाही स्पर्धेत खेळलेला नाही. जागतिक क्रमवारीतही तो दुसऱ्या स्थानावर आला आहे. अल्कराझने रविवारी क्वीन्स क्लब स्पर्धा जिंकून क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे.जोकोव्हिचने गेल्या चार विम्बल्डन स्पर्धात विजेतेपद मिळवले असून एकूण सात वेळा त्याने ही स्पर्धा जिंकली आहे. ऑल इंग्लंड क्लबने २०२२ मध्ये युक्रेनवरील आक्रमणामुळे रशिया आणि बेलारुसच्या खेळाडूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. याचा निषेध म्हणून ‘एटीपी’ आणि ‘डब्लूटीए’ने सर्व खेळाडूंचे मानांकन गुण रोखण्याचा निर्णय घेतला. या वेळी मात्र ऑल इंग्लंडने हा निर्णय मागे घेतला असून, रशियाच्या डॅनिल मेदवेदेवला तिसरे, तर बेलारुसच्या अरिना सबालेन्काला महिला एकेरीत दुसरे मानांकन देण्यात आले आहे.
गेली दोन वर्षे महिला क्रमवारीत आघाडीवर असलेल्या पोलंडच्या इगा श्वीऑनटेकला महिला एकेरीत अपेक्षित अग्रमानांकन मिळाले आहे. या वर्षीच्या फ्रेंच विजेतेपदासह कारकीर्दीत श्वीऑनटेकने एकूण चार ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. मात्र, विम्बल्डनमध्ये तिला कधीही चौथ्या फेरीच्या पुढे जाता आलेले नाही. गतविजेत्या एलिना रायबाकिनाला तिसरे मानांकन मिळाले आहे.
जागतिक क्रमवारीनुसार मानांकन
ऑल इंग्लंड क्लब पुरुष एकेरीत २००२ ते २०१९ या कालावधीत विम्बल्डन आणि अन्य ग्रास कोर्टवरील स्पर्धेच्या कामगिरीनुसार स्पर्धेचे मानांकन निश्चित करत होते. मात्र, २०१९ नंतर आता खेळाडूच्या जागतिक क्रमवारीनुसार मानांकनाचा निर्णय घेतला जातो.