‘फिफा’ कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात मोठय़ा फरकाने विजय मिळवण्याचा विक्रम विश्वविजेत्या स्पेनने शुक्रवारी साकारला. स्पेनने दुबळ्या ताहिती संघावर १०-० अशा फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरीत रुबाबात मजल मारली.  
युरोपियन चषक विजेत्या स्पेनने दहा गोल्सचा नजराणा पेश करत तमाम चाहत्यांना खूश केले. फर्नाडो टोरेसचे चार गोल, डेव्हिड व्हिलाची हॅट्ट्रिक तसेच डेव्हिड सिल्वाचे दोन गोल आणि जुआन माटा याच्या एक गोलमुळे स्पेनने गोलांचे ‘दशक’ पूर्ण केले. याआधी ‘फिफा’च्या स्पर्धामध्ये एकाही संघाला १०-० अशा फरकाने विजय मिळवता आलेला नाही. ‘‘स्पेन आणि ताहितीच्या खेळात किती फरक आहे, हे गोलवरून स्पष्ट जाणवत आहे. आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळ केला,’’ असे स्पेनचे प्रशिक्षक विन्सेंट डेल बॉस्के यांनी सांगितले.
सर्जी रामोस वगळता डेल बॉस्के यांनी स्पेन संघात १० बदल केले. टोरेसने पाचव्या मिनिटालाच ताहितीचा गोलरक्षक मायकेल रोचे याला चकवून स्पेनला आघाडीवर आणले. त्यानंतर स्पेनने पहिल्या सत्रात १० मिनिटांच्या फरकाने तीन गोल लगावत ताहितीला आणखी सहन करावे लागणार, याचे संकेत दिले होते. दुसऱ्या सत्रात स्पेनने गोलचा ‘षटकार’ लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा