गेल्सेनकिर्चेन : तीन युरो चषक विजेत्या स्पेनने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करत यंदाच्या युरो फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. सामन्याच्या उत्तरार्धात ५५व्या मिनिटाला झालेल्या स्वयंगोलच्या जोरावर स्पेनने इटलीचा १-० असा पराभव केला.स्पर्धेतील ‘ब’ गटातून सलग दुसऱ्या विजयाने स्पेनने आपली आघाडी भक्कम केली आहे. स्पेनच्या खेळात तंत्रशुद्धता असली, तरी त्यांना यापेक्षा अधिक मोठा विजय मिळवता आला असता, मात्र तसे झाले नाही. सामन्यात तब्बल २० पैकी केवळ ९ फटकेच गोलजाळ्याच्या दिशेने गेले. मुळातच थकलेल्या इटलीच्या खेळात जोर नव्हता. त्यांना ९० मिनिटांत गोलजाळीच्या दिशेने केवळ एकच फटका मारता आला. अर्थात, दोन्ही संघांच्या फटक्यात अचूकतेचा अभाव होता. प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर स्पेनची ही सर्वोत्तम कामगिरी म्हणता येईल, असे प्रशिक्षक लुईस डी ला फुनेन्टे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पेनने अनेकदा इटलीच्या बचावफीळीची परिक्षा बघितली. संघातील १६ वर्षीय लॅमिने यामलने आपल्या खेळाने आपल्याबद्दलच्या अपेक्षा अधिक उंचावल्या. सामन्याचा मानकरी ठरलेल्या निको विल्यम्सने इटलीच्या बचावपटूंवर वर्चस्व राखले. सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित करुनही स्पेनला मात्र गोल नोंदविण्यात यश आले नाही. त्यांचा विजयी गोल इटलीच्याच रिकार्डो कॅलाफिओरीने केला. सामन्याच्या ५५व्या मिनिटाला झालेल्या या स्वयंगोलने स्पेनचे खाते उघडले. स्पेनच्या अल्वारो मोराटाचा हेडर अडवण्याच्या नादात कॅलाफिओरीकडून हा गोल झाला. गेल्या युरो स्पर्धेत उपांत्य फेरीत स्पेनला इटलीकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवाचा वचपा या सामन्यात स्पेनने काढला. स्पेनने २०१२ मध्ये युरो स्पर्धेचे विजेतेपद मिळवले, त्यानंतर गेल्या तीन विश्वचषक स्पर्धांत स्पेनला साखळीतूनच बाहेर पडावे लागले होते.

हेही वाचा >>>T20 WC 2024: एडन मारक्रमच्या अफलातून कॅचने फिरली मॅच; उत्कंठावर्धक लढतीत आफ्रिकेचा इंग्लंडवर ७ धावांनी विजय

ऑस्ट्रियाकडून पोलंड पराभूत

उत्तरार्धातील वेगवान खेळाच्या जोरावर ऑस्ट्रियाने लेवांडोवस्कीशिवाय खेळणाऱ्या पोलंडला युरो फुटबॉल स्पर्धेत ३-१ असे हरवले. सामन्याच्या नवव्याच मिनिटाला गेर्नाट ट्रॉनरने ऑस्ट्रियाला आघाडीवर नेले होते. मात्र, ३०व्या मिनिटाला क्रिस्तोफ पिआटेकने पोलंडला बरोबरी राखून दिली. पण, त्यांना ही बरोबरी टिकवता आली नाही. सामन्याच्या ६६व्या मिनिटाला बॉमगार्टनरने गोल करुन ऑस्ट्रियाला आघाडीवर नेले. त्यानंतर ७८व्या मिनिटाला मिळालेली पेनल्टी मार्को अर्नाटोविचने सहज मारून ऑस्ट्रियाचा तिसरा गोल करुन आघाडी भक्कम केली. या विजयाने तीन गुणांसह ऑस्ट्रियाने बाद फेरी गाठण्याचे आव्हान कायम राखले. पोलंडला मात्र या वेळी साखळीतूनच आव्हान गमवावे लागले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spain into knockout round with second win sport news amy
Show comments