राष्ट्रगीत सुरू असताना छाती अभिमानाने फुलून येणे, स्वाभाविक असते. पण फिफा विश्वचषकादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना खेळाडूंच्या भावनांचा बांध फुटलेला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मेक्सिकोविरुद्धच्या सामन्याआधी नेयमारच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. कोलंबियाविरुद्धच्या सामन्याआधी राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर आयव्हरी कोस्टचा मधल्या फळीतील खेळाडू सेरे डाय ढसाढसा रडू लागला. त्याच्या रडण्यामागचे कारण कुणालाही समजत नव्हते. सहकाऱ्यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याच्या रडण्यामागचे रहस्य सर्वाना समजले. सेरे डायच्या वडिलांचा मृत्यू दहा वर्षांपूर्वीच झाला होता. पण सामना सुरू होण्याच्या दोन तास आधी सेरे डायच्या वडिलांच्या मृत्यूची चुकीची बातमी इंटरनेटवर झळकली आणि वडिलांच्या आठवणीने तो गहिवरून गेला. तो भलेही शरीराने खेळत होता, पण त्याचे चित्त थाऱ्यावर नव्हते. अखेर त्याच्या चुकीमुळेच कोलंबियाला दुसरा गोल करता आला. त्यामुळे आयव्हरी कोस्टला हा सामना २-१ असा गमवावा लागला.
 स्पेनची गच्छंती!
फिफा विश्वचषकातील गतविजेत्या स्पेनची नाचक्की झाली आणि आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय सट्टाबाजारातून त्यांची गच्छंती झाली. आता अव्वल पाच जणांमध्ये स्पेनची जागा नेदरलँड्सने घेतली आहे. सट्टाबाजारात सुरुवातीला चक्क खालच्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँड्सने फ्रान्सलाही मागे टाकले आहे. जागतिक क्रमवारीत ब्राझीलला जर्मनी आणि अर्जेटिनाचे आव्हान कायम आहे. मात्र खालच्या क्रमांकावर असलेल्या इटली, चिली या संघांचा भाव वधारला आहे. शनिवारी होणाऱ्या अर्जेटिना-इराण आणि जर्मनी-घाना या सामन्यांकडेही सट्टेबाजांचे लक्ष आहे. अनपेक्षित निकाल लागू नयेत, असेच सट्टेबाजांना वाटत आहे. मात्र पंटर्स कमालीचे आशावादी आहेत. जर्मनीविरुद्ध घानाला त्यांनी पसंती दिली आहे. थॉमस म्युलर, लिओनेल मेस्सी, नेयमार, रॉबिन व्हॅन पर्सी आणि आर्येन रॉबेन अशी नावे आता पुढे आहेत.
आजचा भाव :
    १. अर्जेटिना    इराण
    ३५ पैसे(१/७)    तीन रुपये (२८/१)
    २. जर्मनी     घाना
    ३५ पैसे (१/३)    तीन रुपये (१०/१)
    ३. नायजेरिया    बोस्निया
    ७० पैसे(७/२)    दीड रुपया (७/४).
– निषाद अंधेरीवाला
एक डाव भुताचा!
फिफा विश्वचषकाच्या सामन्याचा आनंद लुटायला साओ पावलो येथील इटाक्वेराओ स्टेडियमवर चक्क एक पिशाच्च आलं होतं. या पिशाच्चाचं फुटबॉलवर निस्सीम प्रेम. त्यामुळे त्यानं कुणालाच अपाय केला नाही. लुइस सुआरेझच्या गोलचाही त्यानं आपल्या परीनं जल्लोषात आनंद साजरा केला. कालांतरानं कळलं की उरुग्वेच्या एका चाहत्यानंच ही वेशभूषा साकारली होती.

वृत्तपत्रे म्हणतात
इग्लंडच्या पराभवाविषयी
* गचाळ कामगिरी, ढिसाळ बचाव, दडपण पेलण्यात असमर्थ!
– द डेली मेल
* इंग्लंड आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर
– द गार्डियन
* सुआरेझकडून इंग्लंडचा धुव्वा
– द टेलिग्राफ

Story img Loader