विश्वविजेत्या स्पेनने कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेत शानदार सलामी दिली. दक्षिण अमेरिकन चषक विजेत्या उरुग्वे संघावर १-२ असा विजय मिळवीत स्पेनने थाटात सुरुवात केली. इटलीने आंद्रिया पिलरे आणि मारियो बालोटेल्ली यांच्या गोलांच्या बळावर मेक्सिकोचा २-१ असा सहज पाडाव केला.
कॉन्फेडरेशन चषकाचे जेतेपद पटकावण्याच्या दृष्टीने मैदानात उतरलेल्या स्पेनने या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजविले. प्रेडो रॉड्रिग्जने पहिला गोल नोंदवला तरी त्याला नशिबाचीही तितकीच साथ लाभली. उरुग्वेचा बचावपटू दिएगो लुगानोने आपलाच गोलरक्षक फर्नाडो मुस्लेरा याचे लक्ष विचलित केले. त्यामुळे प्रेडोने मारलेला फटका थेट गोलजाळ्यात गेला. पहिल्या १५ मिनिटांत मोजक्या वेळा उरुग्वेला चेंडूवर ताबा मिळवता आला. चेंडूवर अधिकाधिक ताबा मिळवल्यामुळे स्पेनला २०व्या मिनिटाला खाते खोलता आले. सेस्क फॅब्रेगसच्या सुरेख कामगिरीवर ३८व्या मिनिटाला रॉबेटरे सोल्डाडो याने दुसऱ्या गोलाची नोंद केली. दुसऱ्या सत्रावरही स्पेनचेच वर्चस्व राहिले. पण या सत्रात शारीरिक चकमकी झाल्यामुळे उरुग्वेला ८८व्या मिनिटाला फ्री-किकची संधी मिळाली. त्याचा फायदा उठवत लुइस सुआरेझने उरुग्वेसाठी पहिला गोल केला. पण तोपर्यंत सामना त्यांच्या हातातून निसटला होता.
मारियो बालोटेल्लीची क्षमता आणि विकसित होत असलेली गुणवत्ता इटलीसाठी फायदेशीर ठरत आहे. आंद्रिया पिलरेने १००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात २७व्या मिनिटाला इटलीसाठी पहिला गोल झळकावला. पण इटलीला हा आनंद फार काळ टिकवता आला नाही.
३४व्या मिनिटाला जेवियर हेर्नाडेझने पेनल्टीवर गोल लगावत मेक्सिकोला १-१ अशी बरोबरी साधून दिली. ७८व्या मिनिटाला इमान्युएल गियाचेरिनी याच्या पासवर दोन बचावपटूंच्या मधून मार्ग काढत बालोटेल्लीने इटलीसाठी केलेला दुसरा गोल विजयात निर्णायक ठरला. मात्र आनंदाच्या भरात जर्सी काढल्यामुळे पंचांनी त्याला पिवळे कार्ड दाखवले. जपानविरुद्धच्या सामन्यात त्याला दुसरे पिवळे कार्ड मिळाल्यास, ब्राझीलविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या लढतीत तो खेळू शकणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा