फ्रान्सची शुभ्र धुलाई केल्यानंतर युरोप दौऱ्यातील स्पेनविरुद्धच्या मालिकेतील पहिल्याच लढतीत भारताला दारुण पराभव पत्करावा लागला. स्पेनने भारताच्या कमकुवत बाबींवर आक्रमण करून ४-१ असा विजय मिळवला.
पहिल्या सत्रात आघाडीपटू एस.व्ही. सुनीलच्या गोलने भारताचे खाते उघडले, परंतु सातत्यपूर्ण खेळाच्या अभावामुळे भारताने सामन्यावरील पकड गमावली. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक सुरुवात केली आणि प्रतिस्पर्धी खेळाडूच्या क्षेत्ररक्षणावर हल्ला चढवला. नवव्या मिनिटाला सेर्गी एनरिकच्या गोलवर स्पेनने १-० अशी आघाडी घेतली. मात्र, पुढच्याच मिनिटाला व्ही.आर. रघुनाथने दुरून दिलेल्या पासवर सुनीलने गोल केला आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांकडून आक्रमकता अधिक तीव्र झाली. ‘हल्ला आणि प्रतिहल्ला’ या नाटय़ात दुसऱ्या सत्रानंतरही १-१ अशीच बरोबरी होती.
तिसऱ्या सत्रात दोन्ही संघ नव्या रणनीतीने मैदानात उतरले. ३१व्या मिनिटाला स्पेनला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर पाओ क्युएमाडाने गोल केला. चौथ्या सत्रात २-१ अशा आघाडीमुळे मनोबल उंचावलेल्या स्पेनकडून अधिक बहारदार खेळ झाला. स्पेनला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु भारताचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने तो प्रयत्न हाणला. ५३व्या मिनिटाला जॉर्डी कॅरेराने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून स्पेनची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. सलग दोन गोल स्वीकारूनही भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ करून स्पेनवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्पेनच्या अचंबित करणाऱ्या आक्रमणाने भारताचा पराभव निश्चित केला. ५६व्या मिनिटाला रॉस ऑलिव्हाने गोल करून स्पेनला ४-१ अशी आघाडी मिळवून दिली.
स्पेनकडून भारताचा धुव्वा
फ्रान्सची शुभ्र धुलाई केल्यानंतर युरोप दौऱ्यातील स्पेनविरुद्धच्या मालिकेतील पहिल्याच लढतीत भारताला दारुण पराभव पत्करावा लागला.
First published on: 12-08-2015 at 02:08 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spain thrash india 4 1 in hockey series opener