स्पेनने ५ जुलैला झालेल्या युरो कपच्या फूटबॉल सामन्यात जर्मनीला २-१ ने हरवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. स्पेन आणि जर्मनी यांच्यात रोमहर्षक सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधली होती. सामना पेनल्टी शूटआऊटच्या दिशेने वाटचाल करत होता. मायकल मेरिनोने ११९ व्या मिनिटाला गोल केला आणि शानदार विजय मिळवला. तसंच यजमान जर्मनीला हरवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मेरिनोने केला गोल
मेरिनोने गोल केल्यानंतर लोकांची जुनी आठवण जागृत झाली. त्याचे वडील मिगुएल मेरिनो यांनीही १९९१ मध्ये यूएफा कपमध्ये याच मैदानात गोल केला होता. ती आठवण सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केली आहे.
हे पण वाचा- दुसऱ्या विजयासह स्पेन बाद फेरीत; गतविजेत्या इटलीवर १-० अशी मात
मायकल मेरिनोने काय म्हटलं?
“मला माहीत होतं की वेळ कमी उरला आहे. आमच्या विरोधात प्रतिस्पर्धी संघ रणनीती करुन आम्हाला रोखू शकतो याचीही कल्पना मला होती. तरीही मी निग्रह केला आणि गोल केला. तो झाल्यानंतर काही सेकंदांसाठी मलाही विश्वास बसला नाही की मी गोल केला. मी माझ्या टीमसाठी खेळलो यासाठीही मी खूप खुश आहे.” असं मायकल मेरिनोने म्हटलं आहे.
मायकल मेरिनोने केलेल्या गोलमुळे सामना स्पेनच्या खिशात
मायकल मेरिनोच्या विजयी गोलमुळे हा सामना स्पेनच्या खिशात गेला आहे. त्याला साथ देणाऱ्या डेनी ओल्मोने सेकंड हाफमध्ये गोल करुन स्पेनला विजयाच्या दिशेने नेलं होतं. आता स्पेनचा सामना सेमी फायनलमध्ये फ्रान्सशी होणार आहे. कारण फ्रान्सने पोर्तुगालचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला आहे.