बर्लिन : महिनाभरापासून मिळत असलेला युरोपातील शैलीदार फुटबॉलचा आनंद आता अंतिम टप्प्यात आला आहे. युरो अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी स्पेन आणि इंग्लंड हे तुल्यबळ संघ आज, रविवारी मैदानावर उतरतील, तेव्हा स्पेन विजेतेपदाचा विक्रमी चौकार लगावणार की इंग्लंड ५८ वर्षांपासूनचा मोठ्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. इंग्लंड संघाचा पहिल्या युरो जेतेपदाचा प्रयत्न असेल. स्पेनला सर्वाधिक युरो जेतेपदांसाठी जर्मनीसह (तीन) असलेली बरोबरी मोडण्याची संधी आहे.

सांघिक विरुद्ध वैयक्तिक कौशल्य

स्पेन आणि इंग्लंड संघाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास परस्परविरोधी राहिला आहे. स्पेनने आजपर्यंत आपल्या सर्व लढती निर्धारित वेळेत जिंकल्या, तर इंग्लंड संघाला उपांत्य फेरी वगळता सर्वच लढतींत संघर्ष करावा लागला. स्पेनच्या यशात सांघिक कामगिरीचा अधिक वाटा दिसून आला, तर इंग्लंड संघ वैयक्तिक कौशल्यावर टिकून राहिला. वलयांकित खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावून इंग्लंड संघाची नौका काठापर्यंत आणली.

हेही वाचा >>> IND vs ZIM 4th T20I : सिकंदर रझाने रचला इतिहास, झिम्बाब्वेसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

इंग्लंडच्या अनुभवाची कसोटी

साखळी फेरीत इंग्लंडच्या खेळाडूंना आपल्या गुणवत्तेला न्याय देता आला नव्हता. मात्र, बाद फेरीपासून इंग्लंड संघातील वलयांकित खेळाडूंच्या कामगिरीला वेगळीच झळाळी आली. स्लोव्हाकियाविरुद्ध ९५व्या मिनिटाला ज्युड बेलिंगहॅमच्या गोलने इंग्लंडला बरोबरी साधता आली, मग अतिरिक्त वेळेत कर्णधार हॅरी केनने निर्णायक गोल केला. उपांत्यपूर्व सामन्यात पेनल्टी शूट-आऊटमध्ये त्यांनी स्वित्झर्लंडवर बाजी मारली. उपांत्य फेरीत ९०व्या मिनिटाला ऑली वॉटकिन्सच्या गोलने इंग्लंडला सलग दुसऱ्यांदा युरोच्या अंतिम फेरीत पोहोचवले. त्यामुळे त्यांना ५८ वर्षांचा मोठ्या विजेतेपदाचा दुष्काळ संपविण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडच्या कोबी मेइनू, फिल फोडेन, बुकायो साका या खेळाडूंना लय सापडली. त्यांच्या धारदार आक्रमणांनी नेदरलँड्सचा बचाव खिळखिळा केला होता. गोलरक्षक जॉर्डन पिकफर्डनेही या लढतीत आपला खेळ उंचावला. पहिल्या सामन्यापासून संघनिवड, नियोजन आणि खेळाडूंची अदलाबदल अशा विविध कारणांनी टीकेचे लक्ष्य ठरलेल्या प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांना पुन्हा एकदा यशाचे शिल्पकार मानले जात आहेत.

स्पेनची युवा ताकद

स्पेन हा स्पर्धेतील सर्वांत यशस्वी संघ म्हणून समोर आला आहे. सहाही सामने जिंकून स्पेनने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आपल्या नेहमीच्या ‘टिकीटाका’ शैलीवर स्पेनचा भर राहिला असला, तरी या वेळी युवा खेळाडूंनी दिलेली आक्रमकतेची जोड ही वेगळ्या स्पेनची ओळख करून देणारी ठरली आहे. निको विल्यम्स आणि लामिन यमाल या दोन युवा खेळाडूंनी स्पेनच्या आक्रमणाला वेगळी धार मिळवून दिली आहे. आक्रमणात डॅनी ओल्मोही चमकदार कामगिरी करत आहे. समतोल संघ कसा असावा याचे उत्तम उदाहरण स्पेन संघाने दाखवून दिले आहे. मध्यरक्षक रॉड्रीचा खेळ स्पेनच्या विजयात निर्णायक ठरत आहे. त्याची लय कायम राहिल्यास स्पेनला विजेतेपदाचा चौकार मारण्यापासून रोखणे इंग्लंडला अवघड जाईल.

स्पेनचे पारडे जड

स्पर्धेतील आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकल्यास स्पेनचे पारडे जड मानले जाऊ शकते. वैयक्तिक कौशल्यापेक्षा सांघिक खेळाला महत्त्व देत त्यांनी आपली लय कायम राखली आहे. इंग्लंड संघाच्या कामगिरीत सातत्य नाही. मात्र, एकहाती सामना जिंकवू शकणाऱ्या खेळाडूंमुळे ते स्पेनसमोर आव्हान उभे करू शकतील. त्यामुळेच युरोच्या अंतिम लढतीत सांघिक खेळ विरुद्ध वैयक्तिक गुणवत्ता अशी लढत बघायला मिळेल असा अंदाज बांधला जात आहे.

प्रतिस्पर्धी संघांबाबत…

● स्पेन २०१२ नंतर मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत. तेव्हा युरो स्पर्धेत इटलीवर मात करून विजेतेपद.

● इंग्लंडला १९६६ विश्वविजेतेपदानंतर मोठ्या विजेतेपदाची प्रतीक्षा. पहिल्या युरो जेतेपदाचा प्रयत्न.

● २०२१ युरो स्पर्धेच्या अंतिम फेरीत घरच्या वेम्बली मैदानावर इंग्लंड इटलीकडून पराभूत.

● इंग्लंड-स्पेन २०१८ नंतर प्रथमच आमनेसामने. तेव्हा नेशन्स लीग स्पर्धेत वेम्बली मैदानावर स्पेनचा २-१ विजय, तर सेव्हियाच्या मैदानावर इंग्लंडचा ३-२ विजय.

 वेळ : मध्यरात्री १२.३० वा. ● थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन १, २, ३, सोनी लिव्ह अॅप ● ठिकाण : ऑलिम्पिक स्टेडियम, बर्लिन

Story img Loader